पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील दलित हत्याकांडातील आरोपी पकडण्यात दिरंगाई होऊ लागल्याने जिल्ह्य़ात आता आंदोलनाचा उद्रेक होऊ लागला आहे. ठिकठिकाणी बंद पाळला जात आहे तसेच रास्ता रोकोही होत आहे. पोलीस कसून तपास करत आहेत, मात्र त्यांना अजून आरोपींपर्यंत पोहोचता आलेले नाही.
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने उद्या, सोमवारी नगर शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित केला आहे. त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. उद्या पाथर्डी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. आज पाथर्डीत दलित संघटनांनी रास्ता रोकोही केला. तीसगाव येथेही बंद पाळण्यात आला. कुकाणे (ता. नेवासे) येथेही रिपब्लिकन पक्षांतील विविध गटांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले. कोपरगाव येथेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी घटनेचा निषेध केला. राज्यातील नेतेमंडळी जवखेडे खालसा येथे भेट देत आहेत व घटनेचा निषेध करत आहेत.
जवखेडे येथे गेल्या सोमवारी तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलीस तपास करत आहेत, मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. पोलीस पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. घटना कोणत्या कारणातून घडली याबाबत पोलीस स्पष्ट बोलण्यास तयार नाहीत, त्यामुळे विविध चर्चाही होत आहेत. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण साळुंके गेल्या दोन दिवसांपासून पाथर्डीत मुक्काम ठोकून आहेत, मात्र त्याचाही परिणाम झालेला नाही.
यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गुन्ह्य़ाचा विविध दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. वेगवेगळ्या संशयितांकडे चौकशी केली जात आहे, मात्र अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. जोपर्यंत आरोपींना अटक केली जात तोपर्यंत गुन्ह्य़ाचे कारण जाहीर करता येणार नाही. राज्यपालांनी गुन्ह्य़ाच्या शोधासाठी ‘टास्क फोर्स’ स्थापन करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त असले तरी त्यासंदर्भात अजून येथे काहीही आदेश आलेले नाहीत.