छेडछाडप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार कार्यवाही टाळण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महिला पोलीस उपनिरीक्षकास येवला शहर ठाण्याच्या आवारातच लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले.
शहरातील संतोष काशिनाथ सोनवणे यांच्याविरोधात छेडछाड केल्याची तक्रार रविवारी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. चौकशी अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक मंगल जोगण यांनी या प्रकरणी सोनवणे यांच्याकडे अटक होऊ नये म्हणून  १० हजार रुपयांची मागणी केली; परंतु नंतर पाच हजार रुपयांत समेट घडला. दरम्यान, संतोषने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधला.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने सापळा रचला. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास तक्रारदार सोनवणे यांच्याकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना उपनिरीक्षक जोगण यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
मागील आठवडय़ात पंचायत समितीतील अधिकाऱ्याविरोधात अशीच कार्यवाही झाली, तर प्रांत अधिकारी रामसिंग सुलाने, शाखा अभियंता पी. एम. सोनवणे व पोलीस उपनिरीक्षकांसह दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे.