आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार पंडित बबनराव हळदणकर यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणा-या हळदणकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
शुक्रवारी पं. बबनराव हळदणकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पं. हळदणकर यांच्या पार्थिवावर रविवारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.
१९२७ मध्ये जन्मलेले पं. बबनराव हळदणकर यांनी शास्त्रीय संगीताचे धडे उस्ताद खादीम हुसैन यांच्याकडून घेतले. पं. हळदणकर यांना कलेचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील हे ख्यातनाम चित्रकार होते. सुरेलपणाबरोबरच तालावर प्रभुत्व असलेले, राग सादरीकरणामध्ये शुद्ध भाव जपण्याबरोबरच मोजकेपणा आणि चपखलता याचे मिश्रण असलेले आणि ख्याल गायनामध्ये ध्रुपदची परंपरा जतन करणारे एकमेव घराणे अशी आग्रा घराण्याच्या गायकीची वैशिष्टय़े. हळदणकर यांच्या गाण्यांमधून याची झलक दिसायची. पं. हळदणकर यांची बंदीश ऐकताना रसिक मंत्रमुग्ध होत. शास्त्रीय संगीतातील ५० वर्षाच्या योगदानासाठी हळदणकर यांना चतुरंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय संगीत नाटक अकादमीच्या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.
आग्रा घराण्याचा वारसा तरुण पिढीने पुढे न्यावा यासाठी पं. हळदणकर यांनी अनेक युवा गायकांना गायनाचे धडेही दिले. मुंबई विद्यापीठात भारतीय संगीताचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले होते. त्यांच्या ‘जुळू पाहणारे दोन तंबोरे’ या पुस्तकाला राज्य सरकारचा पुरस्कारही मिळाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 18, 2016 11:54 am