कॉंग्रेस नगरसेविका व माजी महिला व बालकल्याण सभापती सुनिता अग्रवाल यांनी प्रभागात मंजूर झालेले चार बालोद्याने तयार न करता त्यासाठी मनपाने खरेदी केलेले १ लाख ८७ हजाराचे साहित्य प्रभागातील खासगी शाळा व कॉन्व्हेंटमध्ये लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची तक्रार मनपा आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
येथील इंदिरानगर प्रभागाच्या नगरसेविका सुनिता अग्रवाल यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती असतांना पदाचा दुरुपयोग करून मनपाच्या निधीतून तब्बल १ लाख ८७ हजाराचे बालोद्यानाचे साहित्य खरेदी केले. हे साहित्य प्रभागातील बगीचा व मोकळ्या जागेत लावायला हवे होते, परंतु प्रभागातील काही खासगी शाळा व कॉन्व्हेंटमध्ये ते लावण्यात आले. नूतन हनुमान मंदिर मैदान, जय श्रीराम हनुमान मंदिर मैदान, डॉ.ढवस यांच्या घराजवळील हनुमान मंदिर येथील खुली जागा व अन्य चार ठिकाणी मोकळ्या जागेत लहान मुलांना खेळण्याकरिता व वृध्दांना विश्रांतीकरिता चार बालोद्याने तयार करून त्या ठिकाणी झुले, घसरणपट्टी, विश्राम खुर्ची व खेळण्याचे साहित्य लावण्याबाबत ३० ऑक्टोबर २०१२ ला झालेल्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत ठराव घेऊन चार बालोद्याने मंजूर करून कंत्राट काढण्यात आले. त्याची वर्कऑर्डरही कंत्राटदाराला देण्यात आली, परंतु सुनिता अग्रवाल यांनी पदाचा गैरफायदा घेऊन इंदिरानगरात मोकळ्या मैदानात बालोद्यान न बनविता हे साहित्य खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आर्थिक व्यवहार करून देण्यात आले आहेत. उद्यानातील विश्राम खुच्र्या मर्जीतील लोकांच्या घरासमोर ठेवण्यात आले.
यापूर्वी मनपाने सिमेंट बेंचेस अडीच हजार रुपयेप्रमाणे खरेदी केले होते. तेच सिमेंट बॅंचेस ३५०० च्या जादा दराने खरेदी करण्यात आले.
अशा प्रकारे इंदिरानगर प्रभागातील मंजूर झालेले चारही बालोद्याने सुनिता अग्रवाल यांनी गहाळ करून मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांची दिशाभूल केली. या संपूर्ण घोटाळ्याने मनपा सदस्य थक्क झाले आहेत.
ज्या मैदानात बालोद्यान मंजूर करण्यात आले ते मैदान अजूनही जैसे थे आहे. चार बालोद्यानात झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराची मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यांनी चौकशी करावी, अशी मागणी या प्रभागातील नागरिकांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
मनपा नगरसेवकाने प्रभागातील बालोद्याने गायब करून तेथील साहित्य खासगी कॉन्व्हेंटमध्ये लावण्याचा हा प्रकार येथे प्रथमच घडला असल्याने या नगरसेविकेवर कडक कारवाई करावी, अशीही मागणी लावून धरण्यात आली आहे.
यासंदर्भात अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता प्रथम त्यांनी फोन घेतला नाही. त्यानंतर वारंवार त्यांच्याशी संपर्क साधला असता यासंदर्भात माहिती घेऊन बोलते, असेही त्या म्हणाल्या.

अग्रवाल बीपीएल यादीत
कॉंग्रेस नगरसेविका सुनिता अग्रवाल यांचे नाव बीपीएल यादीत आहे. दुमजली इमारत, स्वत:चे ट्रॅक्टर व मोठे किराणा दुकान आहे. एवढे असूनही त्या दारिद्रय़रेषेखालील यादीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.