कोकणातील सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी तटरक्षक दलाने पुढाकार घेतला आहे. सागरी सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय वाढवण्यासाठी, तसेच किनारपट्टीवरील लोकांना सागरी सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जनसंपर्क रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.     २६-११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. यानंतर कोकणातील सागरी सुरक्षेत मोठे फेरबदल करण्यात आले, मात्र जोपर्यंत किनारपट्टीवरील लोक सागरी सुरक्षेबाबत सतर्क होणार नाही तोवर सागरी सुरक्षा बळकट होणार नाही, ही बाब तटरक्षक दलाने ओळखली आहे. त्यामुळे आता सागरी सुरक्षेचे महत्त्व मच्छीमारांना तसेच रहिवाशांना पटवून देण्यासाठी जनसंपर्क अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. किनारपट्टीवरील प्रत्येक गावात जनजागृती करण्याचे काम या रॅलीतून केले जाणार आहे.
२६-११च्या हल्ल्यानंतर मुरुड, डहाणू आणि रत्नागिरी येथे तटरक्षक दलाचे बेस कॅम्प उभारणी करण्यात आली आहे, तर कोकणातील नऊ ठिकाणी नवीन सागरी पोलीस ठाणी उभारण्यात आली, मात्र आपत्कालीन परिस्थितीत या सगळ्या यंत्रणामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. या उद्देशाने या जनसंपर्क रॅलीत नेव्ही, तटरक्षक दल आणि पोलीस या तीनही यंत्रणांना एकत्रित करण्यात आले असल्याचे तटरक्षक दलाचे कमांडर इन चीफ विजय कुमार यांनी सांगितले.
पुढील तीन दिवसांत कोकणातील गावागावांत जाऊन लोकांचे प्रबोधन करण्याचे काम या रॅलीतून केले जाणार आहे. सागरी सुरक्षेत मच्छीमारांचा सहभाग वाढवण्याचा प्रयत्नही या रॅलीतून केला जाणार आहे.