29 January 2020

News Flash

मराठवाडय़ाच्या पाणीप्रश्नी लोकप्रतिनिधी उदासीन

लोकप्रतिनिधी मराठवाडय़ाच्या पाणी प्रश्नावर उदासीन असल्याचे चित्र पुन्हा एकदा लोकांसमोर आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रदीप नणंदकर, लातूर

मराठवाडय़ाच्या अनुशेषासंबंधी माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली १५ जून रोजी लातुरात मराठवाडा विकास परिषद झाली. या परिषदेत मराठवाडय़ातील एकही खासदार उपस्थित राहिला नाही व अनेक लोकप्रतिनिधींनीही याकडे पाठ फिरवली. पाण्याचा प्रश्न आला की पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी पाणी पळवल्याचा आरोप करणारे लोकप्रतिनिधी मराठवाडय़ाच्या पाणी प्रश्नावर उदासीन असल्याचे चित्र पुन्हा एकदा लोकांसमोर आले आहे.

मराठवाडा विकास परिषदेचा भरपूर गाजावाजा करण्यात आला. मराठवाडय़ातील सर्व खासदार, लोकप्रतिनिधी, पाणी प्रश्नाचे अभ्यासक उपस्थित राहतील व मराठवाडय़ाच्या अनुशेषासंबंधी या परिषदेच्या निमित्ताने पाठपुरावा सुरू होईल व त्याचे रूपांतर लढय़ात होईल अशी भाबडी आशा संयोजकांच्या मनात होती. परिषद पार पडली. मात्र, परिषदेतील सहभागातून व झालेल्या चच्रेतून त्यांची आशा ही भाबडीच राहणार असल्याचे भविष्य समोर आले.

लोकसभा निवडणुकीत माढय़ाला खासदार रणजित निंबाळकर निवडून आल्यानंतर पहिल्यांदा बारामतीकडे वळवलेले पाणी निरा देवघरच्या मूळ क्षेत्रात वळवून खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर व सांगोला या पाच तालुक्यांचा अनुशेष भरून काढण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली. आपण निवडून आल्यापेक्षा आपल्या भागातील लोकांचा पाण्याचा प्रश्न मिटवू शकलो याचा आपल्याला अधिक आनंद असल्याचे खासदार निंबाळकर यांनी म्हटले. निंबाळकरांची तेथील लोकांनी उंटावरून मिरवणूकही काढली.

पश्चिम महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आपल्या भागातील प्रश्नासाठी किती जागरूक असतात हे याचे ठळक उदाहरण होय. मराठवाडय़ाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटावा यासाठी विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना कृष्णा खोरेमधून २३.६६ टीएमसी पाणी मराठवाडय़ाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय करण्यासाठी विलासरावांनी आपली सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. कृष्णेतील पाणी उस्मानाबाद जिल्हा व बीड जिल्हय़ातील आष्टी पाटोदा या भागाला मिळण्याची तरतूद यात होती. गेल्या दहा वर्षांत घोडे आहे तेथेच अडून राहिले. उलट २३.६६  टीएमसीचे २१ टीएमसी व त्यानंतर त्यातील १४ टीएमसी पाणी देता येणार नसल्याचे कृष्णेच्या लवादाने जाहीर केले. केवळ सात टीएमसी पाणी देता येईल असे सांगण्यात आले व गेल्या आठ, दहा वर्षांत ते पाणी आणण्याची योजनाही संथगतीने कार्यरत आहे.

लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उद्घाटनप्रसंगी म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्रातील मंडळींनी एकत्रितपणे आपल्या भागाच्या विकासासाठी काम केले त्यामुळे त्यांनी त्यांच्या भागासाठी केले ते योग्यच केले. मराठवाडय़ाला राज्यातील सर्वोच्च स्थान अनेक वेळा मिळाले. आमच्या मंडळींनी या संधीचा योग्य लाभ उठवला नाही ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. आपले आजोबा डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांचीही यात जबाबदारी होती हे आपण नाकारणार नसल्याचा उल्लेख त्यांनी केला. किमान आपल्या पुढच्या पिढीला तरी पाण्याच्या प्रश्नावर परिषदा घेण्याची वेळ येणार नाही याची काळजी आपण घेऊ या, असे ते म्हणाले. पाण्याच्या प्रश्नी मराठवाडय़ातील सर्व आमदार, खासदार राजकीय पक्षविरहीत एक होतील असे टाळय़ा घेणारे वाक्य त्यांनी उच्चारले. मात्र, दुर्दैवाने वर्षांनुवर्षे मराठवाडय़ातील लोकप्रतिनिधी याबाबतीत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड हे या परिषदेत उपस्थित होते. मराठवाडय़ाच्या प्रश्नासंबंधी सर्व आमदारांना निमंत्रित करूनही चार-पाच जणांव्यतिरिक्त फारसे कोणी या प्रश्नाकडे पहात नसल्याची व्यथा व्यक्त केली.

First Published on June 19, 2019 2:24 am

Web Title: public representatives indifferent over marathwada water crisis
Next Stories
1 अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक
2 जळगाव जिल्ह्य़ात विजया बँक लुटण्याचा प्रयत्न 
3 सभापतींविरोधात अविश्वास ठराव आणणार – चंद्रकांत पाटील
X