प्रशांत देशमुख, वर्धा

पूलगाव दारूगोळा भांडारातील स्फोटानंतर परिसरावर भीतीची दाट छाया पसरली असून विविध तर्कविर्तक मांडले जात आहेत. बॉम्ब निकामी करण्यासाठी सोनगाव, केळापूर, जामणी व अन्य गावातील हजारांवर एकराचा परिसर अधिग्रहित केलेला असून अनेक वर्षांपासून येथे बॉम्ब निकामी केले जातात. परिसरातील अनेकांना येथे रोजीरोटी मिळते. लष्करी जीवनाची छाया पसरलेला हा भाग.

स्फोटके निकामी करण्यासाठी लष्काराने नेमलेला कंत्राटदार गावकऱ्यांना रोजंदारीवर बोलावतो. तुटपुंज्या कमाईमुळे स्फोटानंतर जमा होणाऱ्या भंगाराची वाटणी होते. यातील ७५ टक्के वाटा कंत्राटदार ठेवतो. उर्वरित वाटा मजूर ठेवून घेतात. तांबे, लोखंड, कथिल या स्वरूपातील भंगार चांगल्या भावाने विकले जाते. मजुराच्या वाटय़ाला आलेले भंगार छोटे-मोठे भंगारवाले जागेवरून विकत घेतात. अशा कामांमध्ये दोनशे ते पाच हजारांपर्यंत हिस्सा मिळत असल्याने शेती कामास मजूर मिळणे अवघड असल्याचे माजी सरपंच व शेतकरी संघटनेचे नेते सतीश दाणी यांनी सांगितले.

स्फोटातील एक मृत प्रभाकर वानखेडे यांच्या घरी सोनेगावला शोककळा पसरली होती. त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे, पण त्यावर भागत नाही म्हणून ते भंगार गोळा करायला जात. त्यांना दोन लहान मुले आहेत. उत्पन्नाचा दुसरा आधार नाही. सांत्वनासाठी आलेल्या महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चारुलता टोकस यांनी याप्रकरणी ठोस कारवाईची मागणी केली. मजुरांना किमान प्रशिक्षण व सुरक्षा यंत्रणा असावी. तसेच मृताच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये व वारसांना नोकरी मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

प्रकाश मून हे अनेक वर्षांपासून हे काम करतात. ते म्हणाले की, स्फोट झाला त्यावेळी आम्ही काहीजण दोनशे फुटावर होतो. कर्णकर्कश आवाज झाला. लगेचच चार-पाच जण दूरवर फेकले गेले. काहींचे हातपाय तूटून पडले.  एकाचे धड वेगळे झाले होते. आम्ही पळून आलो. काम करणे धोकादायक असले तरी पैसे बऱ्यापैकी भेटत असल्याने जीवावर उदार होऊन हे काम आम्ही करतो.

खासदार रामदास तडस म्हणाले की,  ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भांबरे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करीत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ते उद्या बुधवारी घटनेची पाहणी करण्यासाठी पुलगावला येण्याची शक्यता आहे. अशी घटना घडण्याची शक्यता पत्राद्वारे सरंक्षण मंत्रालयाच्या निदर्शनास आणली होती. स्फोटके निकामी करण्याची प्रचलित प्रक्रिया जोखमीची आहे.

परिसरातील दहा-बारा गावे आज भीतीच्या छायेत वावरत असल्याचे संरक्षण राज्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले होते, असे तडस म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून स्फोटके निकामी करण्याचे काम पुलगावस्थित चांडक बंधूकडे आहे. पोलीस  त्यांच्या कंत्राटाची तपासणी करत होते. त्यानंतरच पोलिसांच्या कारवाईची दिशा ठरेल. गावकऱ्यांनी कंत्राटदारावरही रोष व्यक्त केला. कोणतीच सुरक्षा न ठेवता ही कामे केल्याने आजची घटना घडल्याचे केळापूरचे दत्ता महाजन यांनी स्पष्ट केले. माजी पं.स. सभापती मनोज वसू यांनी हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे मत मांडले. नाईलाजास्तव काम करणारे गरीब शेतमजूर असेच बळी पडणार काय, असा गावकऱ्यांचा सवाल होता.