News Flash

साखरझोपेतच गावांवर आगीचे लोट

भांडाराच्या कुंपणालाच खेटून आगरगाव आहे. सर्वाधिक झळ या गावाला पोहोचली.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंग सुहाग यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

कानठळ्या बसविणारा आवाज, घरांची पडझड, लोकांची धावाधाव

भीषण आगीचे रौद्ररूप पुलगावच्या दारूगोळा भांडारालगतच्या काही गावांतील गावकऱ्यांनी मंगळवारी पहाटे अनुभवले. भांडारालगतच्या अनेक गावांतील शेतजमीन पूर्वीच सैन्यदलाने अधिग्रहित केली. उर्वरित परिसरातील शेतजमिनीवर नागझरी, सोनेगाव, आगरगाव, मुरदगाव वसले आहे. ही सर्व गावे आगीच्या लोटात झाकोळून गेली होती. पहाटे साखरझोपेत असतांनाच भूकंप झाल्यागत कानठळ्या बसविणारा आवाज झाला. लोक पटापट घराबाहेर पडले. आगीचे लोट, आकाशात दूरवर उडालेली माती, घरांची पडझड, भांडय़ाकुंडय़ांचा आवाज सर्वाना सैरभर करणारा ठरला. अनेकांनी शेताकडे धूम ठोकली. काही देवळीकडे पळाले, तर नांदोऱ्याच्या मार्गे धावू लागले.

या स्फोटामुळे लगतच्या गावांतील काहींना कर्णबाधा झाली. सावंगीच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल रमेश गवारकर यांच्या आप्तांना काही क्षणच त्याला भेटता आले. आग लागल्यानंतरच रमेशला सूचना मिळाली. तो बचावकार्याच्या प्रयत्नात असतांनाच एका अधिकाऱ्याने त्यास संतापून दूर लोटले. हा बचावला, पण  तो अधिकारी मृत्यूमुखी पडला, असे त्याच्या आप्तांनी सांगितले.

भांडाराच्या कुंपणालाच खेटून आगरगाव आहे. सर्वाधिक झळ या गावाला पोहोचली. गावच्या सरपंच सविता आस्तिक पठाडे म्हणाल्या.ह्वप्रथम स्फ ोटाचा आवाज झाल्याने आम्ही घराबाहेर पडलो. उंचच उंच आगीचे लोळ दिसू लागल्याने गावकरी भयग्रस्त झाले होते. पहाटेपर्यंत सर्व जागले. भांडाराच्या सुरक्षा रक्षकासोबत दूरध्वनीवर बोललो. त्याने स्वत:च संकटात असल्याचे सांगितल्याने काहीच माहिती मिळाली नाही. केवळ तलाठय़ाने भेट दिली. वरिष्ठ मात्र फि रकले नाहीत. आम्ही गावकऱ्यांनीच एकमेकांना सांभाळून घेतले. आगरगावातील विशाल दोंदडे या बालकाच्या डोक्यावर दगड पडल्याने तो जखमी झाला. काही घरांचे पितळी कडीकोंडे अर्धवट तुटले, दारांच्या फ ळ्या पडल्या, भिंतींना तडे गेले. अंगणात झोपल्याने काही बचावले. मात्र, भीतीपोटी सकाळी आठपर्यंत गावकरी घराबाहेरच बसून होते व गाव सोडून पळालेली मंडळी परतलेली नव्हती.ह्व

नागझरीचे सरपंच प्रभाकर चौधरी यांनी गावातील घरांचे पुर्नवसन करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, गावात कचरा पेटविण्यास सक्त मनाई आहे. पेटवायचा झाल्यास भांडाराच्या सूरक्षारक्षकांना सूचित करावे लागते. त्यांच्या उपस्थितीत कचरा न जाळल्यास बेदम मारहाण होते. गावात कुणी अनोळखी व्यक्ती दिसल्यास त्याला पकडून सुरक्षा रक्षकांच्या हवाली करणे बंधनकारक आहे. सरपंच व पोलीस पाटलांचा नियमित संपर्क असतो. महिन्यातून एकदा सैन्याधिकाऱ्यांसोबत त्यांची सभा घेतली जाते. सावधगिरीच्या सूचना दिल्या जातात.

सोनेगावचे सतीश दाणी म्हणाले,ह्वआमच्या गावालगतच निकामी बॉम्बची विल्हेवाट लावली जाते. त्याचा चांगलाच फ टका बसतो, पण पुरेपूर काळजीही घेतली जाते. सैन्यदलाच्या अतिरेकी निगराणीमुळे शेती करणे कठीण झाले आहे. या गावांमधून दीडशेवर मजूर, कर्मचारी भांडारात कामाला जातात. सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत त्यांचे काम चालते. या सगळ्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली होती.ह्व

आग दुपारी लागली असती तर परिस्थिती फोर भीषण झाली असती. येसगाव, मुरदगाव येथील अनेक तरुण भांडारात कामाला आहेत. निम्मे येसनकर तेथे कामाला आहे. यापैकीच अमोल येसनकर आगीत मृत्युमुखी पडला. सैन्य भांडारास १९८९ मध्ये लागलेल्या आगीची आठवण सर्वानाच झाली. त्यावेळी गावकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:31 am

Web Title: pulgaon fire in ammunition depot take place at early morning
Next Stories
1 शेतमजुराचा मुलगा नासात शास्त्रज्ञ
2 जनहिताच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे – अनंत गीते
3 नियोजनच्या कामांबाबत प्रशासनाची सतर्कता आवश्यक
Just Now!
X