पावसाअभावी पीक वाया; किलोमागे आठ ते दहा रुपयांनी दरवाढ

यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कडधान्याचे पीक वाया गेल्याने आणि केंद्र सरकारने आयातीवर र्निबध लादल्याने डाळीचे दर आठ दिवसांत किलोमागे आठ ते दहा रुपयांनी वाढले आहेत. प्रतिक्विंटल ५ हजार २०० रुपयांवर आलेली मूगडाळ सांगलीच्या बाजारात ६ हजार ६०० रुपयांवर पोहोचली असून, तूरडाळीच्या दरातही वाढ होत आहे.

यंदा मृग नक्षत्रात पावसाने बऱ्यापकी साथ दिल्याने आणि हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. जिराईत रानात विशेषत: हलक्या आणि माळरानावर कडधान्याची पेरणी केली जाते. मुगासारख्या कडधान्याचा कालावधीच मुळात अडीच महिन्यांचा असतो. मात्र, आद्र्रा, पूर्वा या नक्षत्राबरोबरच पावसाने सलग दीड महिना दडी मारल्याने पेरलेले कडधान्य करपून गेल्याने नवीन मूग बाजारात येण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.

याचा परिणाम बाजारावर झाला असून, दरात आठ दिवसांत वाढ होत आहे. सांगलीच्या बाजारात आज मूगडाळीचा दर ६ हजार ६०० रुपये असून याचा दर ५ हजार ३०० रुपयांपर्यंत खाली आला होता. सांगलीच्या बाजारात शुक्रवारी मसूरडाळ ५ हजार २००, हरभराडाळ ७ हजार ४०० आणि तूरडाळ ६ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल असल्याचे पद्मावती सेल्सचे संचालक विवेक शेटे यांनी सांगितले. याच डाळींच्या दरात आठ दिवसांत क्विंटलला ४०० ते ९०० रुपयांनी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात मात्र डाळींचे दर किलोला ८० रुपयांच्या घरात पोहोचले असून, या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता शेटे यांनी सांगितले. मूग आणि तूरडाळींच्या आयातीवर केंद्र शासनाने प्रतिबंध लागू केल्याने डाळींच्या दराने उसळी मारली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, तर हरभराडाळीचा समावेश वायदे बाजारात केला गेल्याने दर वाढले आहेत.