अपुऱ्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचा कोंडमारा

राज्यात तुरीचे विक्रमी उत्पादन झाल्याने हमीभावात त्याची खरेदी करतांना शासकीय यंत्रणेची तारांबळ उडत आहे. यासाठी उभारलेल्या शासनाच्या लंगडय़ा यंत्रणेमुळे शेतकऱ्यांचा मात्र कोंडमारा होत आहे. बारदान्याअभावी शासनाच्या हमीभावात तूर खरेदीचेच बारा वाजले आहेत. यंदा अपेक्षेपेक्षा उत्पादन दुप्पट झाल्याने राज्यात हा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांचे मात्र मरण होत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तुरीचा प्रश्न चांगलाच गाजत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कमी उत्पादनामुळे गेल्या वर्षी तुरडाळीचे भाव गगनाला भिडले होते. परिणामी,  उत्पादनवाढीसाठी शासनानेच शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले होते. त्यामुळे यंदा राज्यात तुरीचे भरघोस उत्पन्न झाले. त्यामुळे राज्य शासनाने किमान आधारभूत किमतीने नाफेडमार्फत तूर खरेदी सुरू केली. राज्यात १० लाख िक्वटल तूर उत्पादनाचा शासनाचा अंदाज होता. त्यानुसार बारदाना आणि साठवणुकीची तयारी करण्यात आली. मात्र, २८ फेब्रुवारीपर्यंतच राज्यातील तूर खरेदी केंद्रावर १७ लाख िक्वटल तूर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणल्यावर यंत्रणेची तारांबळ उडून अल्पावधीतच बारदान्याअभावी खरेदीवर परिणाम झाला. त्यामुळे राज्य शासनाकडून आणखी १० लाख िक्वटल क्षमतेच्या बारदान्याच्या खरेदीचे आदेश देण्यात आले आहेत. अमरावती विभागात ३९ तूर खरेदी केंद्रांवर बारदाना व गोदामांमुळे खरेदी ठप्प झाले. सर्वच केंद्रांवर हजारो शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे. त्यांना आता मापाची प्रतीक्षा आहे.

अडत्यांकडून िक्वटलमागे ४२०० ते ४५०० रुपये, तर नाफेडच्या खरेदी केंद्रांवर ५०५० रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल शासकीय तूर खरेदी केंद्राकडे अधिक आहे. नाफेडकडे बारदान्याचा पुरेसा साठा नसल्यामुळे मोजलेली तूर कोठे ठेवायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकाच वेळी झालेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीमुळे बाजार समिती आणि नाफेडच्या अधिकारी अडचणीत आले असून हजारो शेतकऱ्यांची तूर बाजार समित्यांच्या आवारात पडून आहे. तुरीच्या मापासाठी बाजार समितीकडून शेतकऱ्यांना दिलेल्या टोकन क्रमांकातही बराच घोळ होत आहे. शेतकऱ्यांना १५-२० दिवस तिष्ठत राहावे लागत आहे.  खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी दराने तूर खरेदी करीत आहेत. त्यात शासकीय तूर खरेदी केंद्रे बंद होणार असल्याच्या अफवेने शेतकरी मोठय़ा प्रमाणात तूर आणत आहेत. कुठल्याही परिस्थितीत हमीभावापेक्षा जास्त दराने तूर खरेदी सुरू होत नाही, तोपर्यंत नाफेड केंद्रांवर तूर खरेदी सुरूच राहणार असल्याची घोषणा सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी केल्याने शेतकऱ्यांना दिसला मिळाला आहे.

रोखरहित व्यवहार

तूर खरेदीसाठी नाफेड केंद्राला शेतकरी प्राधान्य देत आहेत. अडत्यांप्रमाणे शेतकऱ्यांना रोख रक्कम मिळत नाही. नाफेडच्या रकमेसाठी त्यांना ८ ते १० दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात आरटीजीएसद्वारे रक्कम जमा होत असून रोखरहित व्यवहार केले जात आहेत.

भोंगळ कारभार -डॉ.मानकर

नाफेडच्या तूर खरेदी केंद्रांवर अत्यंत भोंगळ कारभार सुरू असून, शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. त्यांना ताटकळत ठेवून परत पाठवण्याचे प्रकार घडले. टोकन प्रक्रियेतही प्रचंड गोंधळ आहे. शासनाने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अशी प्रतिक्रिया भारत कृषक समाजाचे अध्यक्ष डॉ.प्रकाश मानकर यांनी व्यक्त केली.