कडधान्याच्या डाळींचा वायदे बाजार सुरू झाल्याने खुल्या बाजारातील डाळीने शतकाचा दर पार केला आहे. यामुळे सामान्य माणसाच्या आमटीच्या पाण्यात घराचे आढे दिसू लागले आहे. केंद्र शासनाने डाळीसाठी साठेबाजीचे नियंत्रण दूर केल्याने मोठय़ा कंपन्या या वायदेबाजारात उतरल्या असून यामुळे डाळीचे दर कडाडले आहेत.

वर्षपूर्तीनिमित्त महागाईच्या झळा..

गेल्या आठ दिवसांत बाजारातील कडधान्याच्या डाळीचे दर भडकले असून व्यापारी कंपन्यांनी साठेबाजी सुरू केल्याने दर गगनाला भिडले असल्याचे सांगण्यात आले. केंद्र शासनाने कडधान्याच्या डाळीचे साठे करण्यावरील र्निबध उठविल्याने कंपन्यांनी डाळींसाठीही वायदे बाजार सुरू केला असून त्याचे परिणाम किरकोळ बाजारपेठेतील मालाच्या दरावर झाले आहेत.

चत्र-वैशाख हे दोन महिने मध्यमवर्गीय लोक धान्य-डाळीची खरेदी करून वर्षांचा साठा करून ठेवतात. याच गोष्टीमुळे बाजारात भुसार मालामध्ये कडधान्ये आणि डाळींना प्रचंड मागणी आहे. गेल्या सप्ताहात ५० ते ८० रुपये प्रतिकिलो असणाऱ्या डाळींचे दर आता १०० रुपयांवर पोहोचले आहेत. केवळ चणा म्हणजेच हरभरा डाळीचा दर ६० रुपयांवर आहे. तूरडाळ साधी १०० आणि प्रेसिडेंट ११५ रुपये किलोवर पोहोचली आहे. मूग डाळ सुध्दा याच दरात आहे. उडीद डाळ १०५ रुपये किलो झाली आहे. मसूर डाळ १०० रुपये किलो असल्याचे सांगलीतील ठोक व्यापारी विवेक शेटय़े यांनी सांगितले.

देशांतर्गत कडधान्याचे उत्पादन नेहमीप्रमाणेच असले तरी केंद्र शासनाने व्यापाऱ्यांवर साठा करण्यासाठी असणारे र्निबध मागे घेतले आहेत. यामुळे मोठय़ा कंपन्यांनी साठेबाजी करीत डाळीचा बाजारातील पुरवठा थांबवून दरवाढ घडवून आणली असल्याचे दिसून येते. यामुळे किरकोळ बाजारातील कडधान्ये आणि डाळीचे दर कडाडले आहेत.

सामान्य माणसाच्या रोजच्या आहारात आमटी-भाकरी हे नित्याचे पदार्थ मानले जातात. पण बाजारातील डाळींचे भडकलेले दर पाहून केवळ मसाला वापरल्यासारख्या डाळींचा वापर आमटीसाठी केला जात असल्याने आमटीत डाळ दिसण्याऐवजी घराचे आढे दिसत असल्याची उपरोधिक टीका सामान्य लोकांतून होत आहे.