News Flash

खरेदी बंद झाल्याने विदर्भात तूर‘कल्लोळ’!

गेल्या दोन वर्षांपासून तुरीचे संकट कायम आहे. २०१५ मध्ये तुरीचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला होता.

गेल्या दोन वर्षांपासून तुरीचे संकट कायम आहे. २०१५ मध्ये तुरीचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला होता.

तुरीचे भाव वाढल्यानंतर ग्राहक संतापल्यामुळे सरकारने आधी डाळ आयात केली. त्यानंतर शेतकऱ्यांना कडधान्याच्या पेऱ्यासाठी आवाहन केले. त्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. तुरीचे विक्रमी उत्पादन हाती आले. तूर खरेदी करताना कधी बारदाना, तर कधी गोदामाच्या अडचणी समोर करण्यात आल्या. शेतकऱ्यांना अधांतरी ठेवून २२ एप्रिलपासून तूर खरेदी बंद करण्यात आली. यार्डातील तूर खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला खरा, पण अजूनही अनेक भागांत तूर खरेदी सुरू झालेली नाही. शेतकऱ्यांकडील शिल्लक तूर कोण खरेदी करणार आणि विदर्भातील बाजार समित्यांच्या आवारात पडून असलेल्या सुमारे साडेसहा लाख क्विंटल तुरीचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून तुरीचे संकट कायम आहे. २०१५ मध्ये तुरीचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला होता. तुरीच्या भावाने दोनशे रुपये किलोपर्यंत मजल गाठली. सरकार हादरून गेले आणि डाळींच्या आयातीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली. आयातीनंतर डाळीच्या किमती १०० ते १२५ रुपये किलोपर्यंत स्थिर राहिल्या. या वेळचे संकट वेगळे आहे. ते जादा उत्पादन झाल्यामुळे निर्माण झाले आहे. सरकारने जानेवारीपासून तूर खरेदी सुरू केली. मध्यंतरीच्या काळात काही भागांतील खरेदी केंद्रे बंद होती. पण, तरीही शेतकऱ्यांच्या फारशा तक्रारी नव्हत्या. तूर खरेदी केंद्रे बंद केल्यामुळे मात्र जनक्षोभ वाढला होता. त्यावर तोडगा म्हणून सरकारने २२ एप्रिलपर्यंत यार्डात आलेल्या तुरीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला खरा, पण त्यातूनही असंतोष शमलेला नाही. एकीकडे, बाजारात तुरीचे भाव अचानकपणे खाली आले आहेत. बाजार समित्यांमध्ये ६ लाख ५१ हजार क्विंटल तूर पडून आहे. येत्या काही दिवसांमध्ये ही खरेदी होईल, पण शेतकऱ्यांकडील शिल्लक तुरीचे काय, हा प्रश्न कायम आहे.

नाफेड आणि जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांमार्फत विदर्भातील तूर उत्पादक ८ जिल्ह्यांमधून सुमारे १५ लाख ९६ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. तुरीची बहुतांश खरेदी ही व्यापाऱ्यांनी केली आहे. सरकारी खरेदीपेक्षा व्यापाऱ्यांची खरेदी जास्त आहे. शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीत तूर विकावी लागली, हा मोठा आक्षेप आहे. या वर्षी तुरीचे जादा उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण, खरेदीसाठी पुरेशी व्यवस्था करण्यात आली नाही, त्यातच सरकारचे धरसोडीचे धोरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरले आहे.

बारदान नसल्याचे सांगून खरेदी थांबवण्यात आली, पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकण्यासाठी बाजारात आणला होता. तो एकतर परत नेता येत नाही, आणि विकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली, तर आर्थिक भरुदड बसतो, असा पेच शेतकऱ्यांसमोर होता. त्यामुळेच शेतकऱ्यांना नाइलाजाने तूर व्यापाऱ्यांना विकावी लागली. व्यापाऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दर दिला, तरीही कुणाविरुद्ध कारवाई झाली नाही. आता, शेतकऱ्यांकडे पडून असलेली तूर कोण खरेदी करणार, त्याला योग्य भाव मिळणार काय, हे प्रश्न शिल्लक आहेत. आता अवकाळी पावसाची चिन्हे आहेत. वेळेत खरेदीची प्रक्रिया पूर्ण होऊन तूर गोदामात न पोहोचल्यास आवारात खुल्या अवस्थेत पडून असलेल्या तुरीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न शिल्लक आहे.

सरकारने विनाविलंब तूर खरेदी केली पाहिजे. शेतकऱ्यांकडे अजूनही तूर पडून आहे. खरेदीला मुदतवाढ दिली, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. ज्या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर तूर सरकारला विकली, त्याची स्वतंत्र चौकशी करून त्यांना शोधून काढले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये.

– विलास महल्ले, माजी सभापती, अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती.

१ महाराष्ट्रात कडधान्याचे सरासरी क्षेत्र सुमारे २१ लाख ८८ हजार हेक्टर आहे. गेल्या खरिपात २४ लाख ५० हजार हेक्टपर्यंत डाळवर्गीय पिकांचा पेरा व्हावा, असा प्रयत्न होता. प्रत्यक्षात २५ लाख ७७ हजार हेक्टरवर पेरा झाला.

२ कडधान्यात शेतकऱ्यांचा भर तुरीवर होता. तुरीचे क्षेत्र १२ लाख ४० हजार हेक्टर आहे. १२ लाख हेक्टरवर तूर पेरणीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात सुमारे १५ लाख ३३ हजार हेक्टरवर तुरीची पेरणी झाली.

३ कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षी सुमारे २० लाख ३५ हजार टन तुरीचे उत्पादन झाले. तुरीची उत्पादकता हेक्टरी १३२७ किलो होती. प्रत्यक्षात आजवर तुरीची सरासरी हेक्टरी उत्पादकता ही ७०० किलोपर्यंत होती.

४ सरकारने तुरीसाठी ५०५० रुपये क्विंटल हमी भाव जाहीर केला. नाफेडमार्फत खरेदी सुरू झाली. तरी बाजारातही तुलनेत चांगले दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना तूर विकली.

५ डिसेंबरमध्ये अमरावतीच्या बाजार समितीत तुरीचे भाव ५ हजार ते ५ हजार २५० रुपये प्रतिक्विंटल होते. ते आता झपाटय़ाने खाली आले आहेत. व्यापारी आता तुरीला ३४०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल भाव देत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:21 am

Web Title: pulses not purchasing in many parts of maharashtra by government
Next Stories
1 राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
2 दिल्ली- मुंबई कॉरिडोरसाठी आता सक्तीने भूसंपादन?
3 महाराष्ट्रवादी विरुद्ध विदर्भवाद्यांची अस्मितेची लढाई कायम
Just Now!
X