दोन दिवसांत क्विंटलमागे अडीच हजारांची वाढ

सणासुदीच्या दिवसांत तुरीच्या भावाच्या पातळीत उच्चांकी उठाव सुरूच असून, गेल्या दोन दिवसांत तुरीच्या भावात तब्बल अडीच हजार रुपयांनी वाढ झाली. गुरुवारी बाजारपेठेत क्विंटलला १५ हजार रुपये भाव आला. विशेष म्हणजे बाजारपेठेत तुरीची फारशी आवक नव्हती. सोलापूर व गुलबर्गा बाजारपेठेत हाच भाव राहिला.
गेल्या आठवडय़ात तुरीचा भाव साडेबारा हजार रुपयांवर स्थिर होता. मंगळवारी हाच भाव होता. बुधवारी मात्र दीड हजार रुपयांची वाढ होऊन तो १४ हजारांवर पोहोचला, तर गुरुवारी पुन्हा एक हजार रुपयांची वाढ होऊन १५ हजारांचा पल्ला गाठला. तूरडाळीचे ठोक भाव २०५ रुपये किलो राहिले, तर किरकोळ बाजारपेठेत २२५ रुपये किलो भाव राहिला. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जागतिक बाजारात तुरीच्या उत्पादनात होत असलेली घट लक्षात घेऊन केंद्र सरकार एकत्रित खरेदी करणार असल्याचे बुधवारीच जाहीर केले आहे.