अहमदनगरमधील पारनेर येथील ढोकेश्वर टाकळी गावात राहणारा ठका बेलकर गेल्या चार वर्षांपासून केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) कार्यरत आहे…. गुरुवारी त्या दुर्दैवी बसमध्ये ठका बेलकरही बसणार होता… पण बस रवाना होण्याच्या काही वेळेपूर्वी ठका बेलकरला रजा मंजूर झाल्याचे समजले आणि सहकाऱ्यांची भेट घेऊन तो बसमधून उतरला आणि पुढे त्याच बसवर दहशतवादी हल्ला झाला… ठका बेलकर याचे २४ फेब्रुवारी रोजी लग्न असून लग्नासाठीच त्याला रजा मंजूर झाली आणि तो थोडक्यात बचावला.

जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्याने केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. सुटी संपवून सेवेत रुजू होणाऱ्या २,५४७ जवानांना ७० वाहनांतून नेले जात होते. या दरम्यान हा हल्ला झाला होता. २, ५४७ जवानांमध्ये ढोकेश्वर टाकळी गावातील ठका बेलकर याचाही समावेश होता. ठका बेलकर हा सीआरपीएफच्या ७६ व्या तुकडीत कार्यरत असून ही तुकडी सध्या जम्मू- काश्मीरमध्ये तैनात आहे.

गुरुवारी ज्या बसवर दहशतवाद्याने हल्ला केला त्याच बसमधून ठका बेलकरही प्रवास करणार होता. बस रवाना होण्यापूर्वी सीआरपीएफच्या जवानांची बसनुसार यादी तयार करण्यात आली. यात एचआर ४९ एफ ०६३७ या बसमधील यादीत ठका बेलकरचे नाव १५ व्या क्रमांकावर होते.

ठका बेलकरचे २४ फेब्रुवारी रोजी लग्न होते. गावात लग्नपत्रिका छापून तयार होती. लग्नासाठी रजा मिळावी यासाठी त्याने अर्ज देखील केला होता. मात्र, गुरुवारी बस रवाना होण्यासाठी काही तासांचा अवधी असतानाही रजा मंजूर झाली नव्हती. शेवटी देशसेवेला प्राधान्य देत ठका बेलकर हा ड्यूटीवर जाण्यासाठी तयारी करु लागला. तयारी करत असतानाच ठका बेलकरला रजा मंजूर झाल्याचा मेसेज आला. लग्नासाठी रजा मंजूर झाल्याने ठका बेलकर आनंदात होता. सहकाऱ्यांसोबत आनंद साजरा करुन ठका बेलकर बसमधून उतरला. उतरण्यापूर्वी त्याने सर्वांची आवर्जून भेट घेतली होती. यानंतर बस काश्मीरसाठी मार्गस्थ झाल्या.

याच बसवर पुलवामा येथे दहशतवाद्याने हल्ला केला आणि ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यातून ठका बेलकर थोडक्यात बचावला असला तरी सहकाऱ्यांच्या मृत्यूने त्याला मानसिक धक्का बसला आहे.