जम्मू- काश्मीरच्या पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच एकर जमीन देण्याची घोषणा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केली.

पुलवामा येथे गेल्या आठवड्यात जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला होता. या हल्ल्यात 41 जवान शहीद झाले होते. यात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील संजयसिंह भिकमसिंह राजपूत (४५) व लोणार तालुक्यातील चोरपांग्रामधील नितीन शिवाजी राठोड (३७) या दोन जवानांचा समावेश होता. १० फेब्रुवारीला आपली सुटी संपवून ते कर्तव्यावर रुजू झाले होते. कुटुंबीयांसोबत घालवलेली त्यांची ती सुटी शेवटची ठरली. या घटनेचे वृत्त समजताच बुलढाणा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली.

संजयसिंह राजपूत-दीक्षित आणि लोणार तालुक्यातील गोवर्धननगर येथील वीर जवान नितीन राठोड यांच्या घरी संजय राठोड यांनी नुकतीच भेट दिली. त्यांनी दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच मदतही जाहीर केली.  हे दोन्ही प्रस्ताव मंत्रालयात तात्काळ पाठवण्याचे निर्देश त्यांनी यावेळी बुलढाणाच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले. याप्रसंगी सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, तहसीलदार कव्हळे यांच्यासह विविध अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.