जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला. आता केंद्र सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. एकदाच पाकिस्तानचा सोक्ष मोक्ष लावून टाका, असे त्यांनी म्हटले आहे.

पुलवामामधील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारकडे पाकिस्तानसंदर्भात कठोर भूमिका घेण्याची मागणी केली. गुप्तचर यंत्रणांनी हल्ल्यापूर्वी इशारा दिला होता, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव ठाकरे म्हणाले, इशारे देऊनही हल्ला होतो. मग अधिकारी नेमके काय करत होते, ज्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. नुसत्या घोषणा देऊन किंवा दंड थोपटून काहीही होणार नाही. आता या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. आता पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

शांत बसणे मर्दानगी नव्हे. या आधी झालेल्या सर्जिकल स्ट्राइकचा अभिमान आहे. मात्र तो सर्जिकल स्ट्राइक आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये केला होता. ती लोकं आपल्या देशात घुसून घातपात घडवत आहे. जनतेच्या मनात संताप असून जनता सरकारच्या पाठिशी आहे, सरकारने पाकिस्तानमध्ये घुसून धडा शिकवला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.