पुलवामा येथे झालेल्या दहशतावदी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक झाल्याचं दिसतंय. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक किंवा कलाकारांना भारतात काम देऊ नये, अन्यथा मनसे धडा शिकवेल असा इशारा मनसे सिने विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला आहे.

अद्यापही काही भारतीय म्युझिक कंपन्या पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करत आहे. पाकिस्तानी कलाकारांची गाणी असलेले अल्बम बनविण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तानात गाणी रेकॉर्ड करून भारतात पाठविले जातात आहेत. संबंधित कंपन्यांनी ही कामे ताबडतोब बंद करावीत, अन्यथा त्यांचा मनसे स्टाईल समाचार घेतला जाईल, असे खोपकर म्हणाले.

सर्वत्र निषेध –
शुक्रवारी राज्यभरात पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला. आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधाचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. दहशतवादी हल्ल्याचा पुण्यातील कश्मिरी तरुणांनी निषेध केला. हल्ल्यातील शहिदांचं बलिदान देशानं विसरायला नको. त्यांना मारणाऱ्यांना कधीच स्वर्ग लाभू शकत नाही. बंदूक हा कुठल्याच समस्येवरील उत्तर नसून काश्मिरी जनतेला शांती हवी आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. तर या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा औरंगाबादमधल्या तरुणांनीही निषेध केला. मुंबईतल्या भेंडी बाजारात मुस्लीम तरूणांनी निषेध केला. भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भेंडी बाजारातली दुकानंही बंद ठेवण्यात आली होती. यावेळी तरूणांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. तसंच तिरंगाही फडकवण्यात आला.