चाकूचा धाक दाखवून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर तिला कारखान्यात डांबून ठेवल्याबद्दल विनोद भारत गायकवाड (२३, रा. लाईफ लाईन फॅक्टरी, अक्कलकोट रोड एमआयडीसी, सोलापूर) यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश शब्बीर अहमद औटी यांनी दोषी धरून दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम वसूल झाल्यास ती पीडित मुलीला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.
अक्कलकोट रोड एमआयडीसी भागात एका बंद कारखान्यात आरोपी विनोद गायकवाड याने पीडित मुलीला चाकूचा धाक दाखवून आणले व तिच्यावर बलात्कार केला. ३० मार्च २०१३ रोजी हा प्रकार घडला होता. घटनेनंतर विनोद याने पीडित मुलीला तेथेच डांबून ठेवले. दरम्यान, पीडित मुलीच्या मावस बहिणीने तिचा शोध घेण्यासाठी आरोपी विनोद याच्या आजीच्या घरी जाऊन चौकशी केली असता आजीने उडवाउडवीची उत्तरे दिली. शेजारच्या हिराबाई रवी माने हिनेही माहिती दडवून ठेवली. नंतर थोडय़ाच वेळात हिराबाई ही संबंधित बंद कारखान्याकडे जात असताना पीडित मुलीच्या मावस बहिणीने तिचा पाठलाग केला. तेव्हा बंद कारखान्यातून पीडित मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकू आला तेव्हा बहिणीने तेथे धाव घेतली असता सत्य उजेडात आले.
तथापि, आरोपी विनोद गायकवाड याने दोन्ही मुलींना कारखान्यातच डांबून ठेवले व दुसऱ्या दिवशी सोडले. नंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. या खटल्यात सरकारतर्फे अॅड. वामनराव कुलकर्णी, तर आरोपीतर्फे अॅड. संजीव सदाफुले व अॅड. अजमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.