कोल्हापूरची पंचगंगा नदी धोका पातळीवरून वाहत असल्याने पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग तीन दिवस बंद आहे. परिणामी शेकडो वाहनं मार्गाच्या दोन्ही दिशेला अडकून पडली आहेत. या पार्श्वभूमीवर आता महामार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने रविवारी चाचपणी करण्यात आली. मात्र सध्या तरी महामार्ग सुरू होण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापुरामुळे येथील पंचगंगा नदीवरील पुलावर पाणी आले आहे. मुंबई -पुण्याहून बंगळूरूकडे जाणारी वाहने अडकलेली आहेत. तर, दूधगंगा नदीलाही महापूर आल्याने कर्नाटक, दक्षिण भारतातून पुणे -मुंबईकडे जाणारी वाहने देखील जागीच थांबली आहेत. दोन्ही बाजूस वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. नाशवंत माल, औषधे, धान्य, भाजी-पाला आदी अत्यावश्यक सेवेतील माल काही वाहनांमध्ये असून त्याची जिल्ह्यास तातडीने आवश्यकता आहे.

राष्ट्रीय महामार्गावर आज ६ फुट पाणी असतानाही मार्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी महामार्गाची पाहणी केली. बलकवडे म्हणाले,’ महामार्गावर सुमारे ४०० मीटर अंतरावर खूपच अधिक पाणी आहे. प्रवाहाची गती लक्षात घेता सध्या वाहतूक सुरू होऊन शकत नाही. पोकलॅन्ड सुद्धा २५ मीटर हुन अधिक पुढे जाऊ शकत नाही. पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाचे उपअभियंता समाधान पाटील यांनी सांगीतले की,’ पंचगंगा पुलाच्या ‘बेअरिंग सॉकेट’ला पाणी लागले आहेत. तेथून पाणी उतरत नाही तोपर्यंत वाहतूक सुरू करू नये अशा सूचना आहेत. सल्लागार कंपनी तपासणी करून या बाबतचा निर्णय घेईल.

टोल आकारु नये – खासदार संजय मंडलिक

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे महापुरजन्य परिस्थिती निर्माण झालेली असून, राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. राष्ट्रीय मार्ग सुरु झाल्यानंतर या वाहनांकडून टोल नाक्यावर तीन ते चार दिवस टोल आकारू नये, अशी मागणी खासदार संजय मंडलिक यांनी केंद्रीय दळण-वळण मंत्री नितीन गडकरी व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रविवारी तातडीने निवेदनाव्दारे केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune bangalore national highway closed hundreds of vehicles got stuck msr
First published on: 25-07-2021 at 20:46 IST