नाटय़ क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा आणि नाटय़ क्षेत्रात प्रतिष्ठेचा समजला जाणारा नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार पुण्याच्या भरत नाटय़ संशोधन मंदिर संस्थेला जाहीर झाला आहे. गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार समितीचे कार्यवाह चंद्रकांत धामणीकर यांनी पत्रकार बठकीत या पुरस्काराची घोषणा केली. १३ नोव्हेंबर रोजी गोविंद बल्लाळ देवल यांच्या जन्मदिनी सांगलीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
 या पुरस्काराबाबत चंद्रकांत धामणीकर म्हणाले, ‘नाटय़ क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगलीच्या देवल स्मारक मंदिर समितीकडून नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार गेल्या १६ वर्षांपासून दिला जातो. यापूर्वी भालचंद्र पेंढारकर, जयमाला शिलेदार, कान्होपात्रा किणीकर, मास्टर अविनाश, अरिवद पिळगावकर या नाटय़कलावंतांना देवल पुरस्काराने गौरवण्यात आले.’
यंदाच्या वर्षी नाटय़ क्षेत्रातील प्रदीर्घ योगदानाबद्दल पुण्यातील भरत नाटय़ संशोधन मंदिर यांना यंदाचा नाटय़ाचार्य गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५ हजार रुपये रोख आणि सुवर्णपदक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १३ नोव्हेंबर या दिवशी नाटय़ाचार्य गोिवद बल्लाळ देवल यांच्या जन्मदिनी सांगलीचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आणि खादी ग्रामोद्योग महामंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर, सांगली येथे सायंकाळी ६ वाजता या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या वेळी नाटय़ क्षेत्रातील योगदानाबद्दल अरुण दांडेकर, भास्कर पेठे यांचाही सत्कार करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळय़ास नाटय़प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहनही गोविंद बल्लाळ देवल पुरस्कार समितीचे कार्यवाह चंद्रकांत धामणीकर यांनी पत्रकार बठकीत केले.