भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभरात उमटले. मुंबई, डोंबिवली, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध शहरांमध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. तर हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करु असे आश्वासन देतानाच आंदोलकांनी शांतता राखावी, असे आवाहन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले आहे.

सोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरु असतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून मंगळवारी सणसवाडीत तणावपूर्ण शांतता आहे. मात्र, या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्याच्या अन्य भागांमध्येही उमटले.

भीमा कोरेगावातील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलक मुंबईतील चेंबूर स्थानकात रेल्वे रुळावर उतरले होते. भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ चेंबूर, गोवंडी आणि मुलुंडमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. तर डोंबिवलीतील शेलार नाका परिसरातही आंदोलन करण्यात आले. या भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात तणावपूर्ण शांतता असून शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेशही लागू केले आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली असली तरी भीमा कोरेगावमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ हमाल संघटनांनी माल उतरवण्यास नकार दिला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला होता.

गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी भीमा कोरेगाव परिसराला भेट दिली. आंदोलकांनी शांतता राखावी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी म्हटले आहे. हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाई करु असे आश्वासनही त्यांनी दिले. पोलिसांनी योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळली आणि त्यामुळे अनर्थ टळला, पोलीस अधीक्षकांनी सर्व समाजातील नेत्यांची गावात बैठक घेत परिस्थिती नियंत्रणात आणली, असे त्यांनी नमूद केले. हिंसाचारात नुकसान झालेल्या दुकानदारांना आणि वाहनचालकांना मदत मिळावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. पुणे- सासवड मार्गावर भेकराईनगर येथे पीएमपीएल आणि एसटीच्या बसवर आंदोलकांनी दगडफेक केली. अहमदनगर- औरंगाबाद मार्गावरही आंदोलक रस्त्यावर उतरले होते.