राज्यभरात भाजपकडून ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. मात्र पुण्यात भाजपानं ओबीसी राजकीय आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान करोनाचे नियम मोडल्याचं दिसून आलं. पुण्यातील कात्रज चौकात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, खासदार गिरीश बापट, आमदार भिमराव तापकीर, आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मेधा कुलकर्णी, शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन पार पडले. या आंदोलनात जवळपास २०० हून अधिक भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. करोना नियमांचे कोणत्याही प्रकारचे पालन करण्यात आलं नव्हतं. .

पोलिसांनी ५० पेक्षा जास्त लोकांना परवानगी नाकारली होती. त्याबरोबर करोनाचे नियम पाळून आंदोलन करण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र आंदोलनाला सोशल डिस्टन्सिंग, मास्क न घालणे, रस्त्यावर बसून वाहतूक कोंडी केल्याचं दिसून आलं. याप्रकरणी पुणे पोलिसांनी आयोजकांसह १०० ते १५० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. करोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनं १५ महिने फक्त तारखा घेतल्या!

पंकजा मुंडे यांनी यावेळी इम्पेरिकल डेटा जमा करण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचं सांगितलं. “या सरकाने १५ महिने फक्त कोर्टाकडून तारखा घेतल्या. इम्पेरिकल डाटाच्या आधारावर आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारने डाटा तयार करण्यास सांगण्यात आलं. पण सरकारने कोणताही डाटा तयार केला नाही. यांनी जाऊन कोर्टात स्वीकारलं की ओबीसीला जास्त आरक्षण दिलंय. कोर्टानं त्याच दिवशी आरक्षण रद्द केलं आणि ५० टक्क्यांच्या वरची लढाई सुरू असताना ५० टक्क्यांच्या आतलं आरक्षणही संपुष्टात आलं. या सरकारला लाज वाटली पाहिजे”, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

…पण त्याविषयी मी तुर्तास बोलणार नाही; उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

छोटे मन से कोई बडा नहीं होता, और…

दरम्यान, यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली. “अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे मन से कोई बडा नही होता, टूटे मन से कोई खडा नही होता. या सरकारला मला सांगायचंय की एवढं छोटं मन ठेऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. चुकून तुम्ही राजकारणात आलात. भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभं करणार नाही”, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. “देवेंद्रजी म्हणाले तुम्हाला काही जमत नसलं तर आम्हाला सांगा. असंही तुम्हाला काही जमत नाहीये. जेव्हा मी माठाची तिपई बघते, तेव्हा मला आत्ताचं सरकार दिसतं. सगळे आंदोलन गार करण्यासाठी हे तिपईचं सरकार आहे. त्यावरच्या मटक्यावर सगळे आंदोलनं गार करणं हे सरकारचं कर्तव्य दिसतंय”, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.