पुण्यात बेदरकारपणे एसटी बस चालवून नऊ जणांच्या मृत्यूला तसेच ३७ जण जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी संतोष मारुती माने या बसचालकाला मुंबई उच्च न्यायालयाने कायम केलेल्या फाशीच्या शिक्षेला ँपुढील आदेशापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध आरोपी संतोष माने याने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दत्तू यांच्यासह न्या. आर. के. अग्रवाल व न्या. अरुण मिश्रा यांच्या त्रिखंडीय पीठासमोर सुनावणी झाली. माने याच्या वतीने अ‍ॅड. अमोल चितळे व अ‍ॅड. जयदीप माने यांनी बाजू मांडली.  याबाबत न्यायालयाने सरकारी पक्षाला बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.
पुण्यात २५ जानेवारी २०१२ रोजी एसटी बसचालक संतोष माने (रा. कौठाळी, ता. उत्तर सोलापूर) याने अचानकपणे एसटी बस चालवून रस्त्यावरील नऊ निष्पाप व्यक्तींना मृत्यूच्या खाईत लोटून दिले तर अन्य ३८ जणांना जखमी केले होते. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाने माने यास दोषी धरून फाशीची शिक्षा ठोठावली होती. या फाशीच्या शिक्षेविरुद्ध माने याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. अपिलाची सुनावणी न्या. हरदास व न्या. देशमुख यांच्या खंडपीठासमोर झाली होती. आरोपीला दोषी धरल्यानंतर त्यास शिक्षेविषयी त्याची बाजू मांडण्यासाठी संधी देणे बंधनकारक आहे. परंतु पुणे सत्र न्यायालयाने तशी संधी दिली नाही, असे आरोपीतर्फे अ‍ॅड. जयदीप माने यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले होते. हे म्हणणे मान्य करून खंडपीठाने आरोपी माने याची फाशीची शिक्षा रद्द करून फेरचौकशीसाठी खटला पुन्हा पुणे सत्र न्यायालयाकडे वर्ग केला होता. पुणे सत्र न्यायालयाने आरोपी माने यास पुन्हा दोषी धरून फाशीची शिक्षा सुनावली असता त्या निकालाविरुद्ध त्याने केलेले अपील उच्च न्यायालयातील न्या. व्ही. के. कानडे व न्या. डी. बी. कोदे यांच्या खंडपीठाने फेटाळून फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते.