पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपलं आधार कार्ड बँकेत लिंक करण्यास सांगितले होते. त्याला जनतेने मोठ्या प्रमाणावर साथ दिली,यामुळे बँक खाते सुरक्षित झाल्याचे सांगण्यात येत होते. परंतु पुण्याच्या हिंजवडी मध्ये पती आणि पत्नीने बनावट कागदपत्र सादर करून बँक ऑफ महाराष्ट्र बावधन शाखेला ७० लाख रुपयांना फसवण्याचे समोर आले असून दोघे जण फरार झाले आहेत.

या कागद पत्रात आधारकार्डचा देखील समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पती आणि पत्नी विरोधात बँक प्रशासनाने हिंजवडी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे. सोपान भगवंत पोखरकर वय-४० रा.बालेवाडी,सोनाली सोपान पोखरकर वय-३४ रा.बालेवाडी अशी फरार आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकारी रविकुमार दिनेशकुमार पुर्बे यांनी हिंजवडी पोलिसात फिर्याद नोंदवली आहे.त्यानुसार हिंजवडी पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पती सोपान भगवंत पोखरकर आणि पत्नी सोनाली सोपान पोखरकर हे बालेवाडी येथील पार्क एक्सप्रेस मध्ये भाड्याच्या सदनिका मध्ये राहात होते. घर मालकाच्या नकळत घराचे बनावट कागदपत्र बनवून पती आणि पत्नीने ते बावधन येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सादर करत ७० लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

ही फसवणूक काही दिवसांमध्येच समोर आली मात्र तोपर्यन्त पोखरकर दाम्पत्याने पोबारा केला. त्यांचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत. विशेष म्हणजे आणखी एका बँकेतून त्यांनी लाखो रुपये काढल्याची चर्चा आहे हे सर्व पोलीस तपासात समोर येईलच, परंतु त्यांनी आणखी किती बँकेला लाखो रुपयांना लुबाडले आहे, हा प्रश्नच आहे.