पुणे येथील बुधवार पेठेत फरासखाना पोलीस ठाण्याजवळ झालेल्या कमी तीव्रतेच्या बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींकडे सीमकार्डच्या वापरावरून औरंगाबाद तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजी येथील मोबाईल दुकानदार व अन्य एकास औरंगाबादच्या दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली.
प्रकाश गलांडे असे मोबाईल दुकानदाराचे नाव आहे. फुलंब्री येथून कागदपत्रांचा गैरवापर करून मिळविण्यात आलेले हे सीमकार्ड ७ ते २३ जुलै या कालावधीतच सुरू होते. फरासखाना बॉम्बस्फोट प्रकरणात तपास करणाऱ्या यंत्रणेने काही संशयित क्रमांकाची यादी काढली होती. त्यातील काही क्रमांक औरंगाबाद दहशतवाद विरोधी पथकाने तपासावेत, असे कळविले होते. फुलंब्री तालुक्यातील एका व्यक्तीच्या नावे संशयित नंबर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची विचारपूस करण्यात आली. त्या व्यक्तीने तो क्रमांक त्याचा नसल्याचे कळविले. मात्र, ते कार्ड सहा महिन्यांपूर्वी रांजणगाव शेणपुंजी त्याच्या नावाने घेतले गेले.
या प्रकरणी मोबाईल विक्रेता गलांडे याच्याकडे विचारणा केली असता कागदपत्राचे दोन संच दिल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी फुलंब्रीच्या व्यक्तीला हे कार्ड दिल्याचे सांगितले. कागदपत्राच्या दुसऱ्या संचाच्या आधारे मोबाईल विक्रेत्याने दुसरे सीमकार्ड अनोळखी व्यक्तीला दिल्याचे तपासादरम्यान स्पष्ट होत असल्याचे एटीएसच्या सूत्रांनी सांगितले.