जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि इंडियन मुझाहिदीन संघटनेचा दहशतवादी मिर्झा हिमायत बेग याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी गुरुवारी पाच कलमांखाली फाशीची शिक्षा सुनावली. ‘बेग हा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी होता. त्याने फरार आरोपींच्या मदतीने मानवतेला काळिमा फासणारे कृत्य केले. त्याचा दहशतवादी कृत्यात सहभाग दिसून येत असल्याने त्याच्यात सुधारणा होऊ शकत नाही. ही घटना दुर्मीळातील दुर्मीळ प्रकारात येत असल्यामुळे बेगला फाशीची शिक्षाच योग्य आहे,’ असे न्यायाधीशांनी निकालात म्हटले आहे.
जर्मन बेकरी स्फोटाप्रकरणी न्यायालयाने गेल्या सोमवारी बेगला दोषी ठरवले होते. दोषी ठरवलेल्या एकूण सोळा कलमांखाली बेगला शिक्षा सुनावण्यात आली, तर फोर्जरीच्या तीन कलमांमध्ये निर्दोष सोडले. बेगला पाच कलमांमध्ये फाशी, तर पाचमध्ये जन्मठेप सुनावण्यात आली आहे. ‘न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून बेगचा बॉम्बस्फोटाच्या कटात सहभाग होता. त्याची अंमलबजावणी फरार आरोपींच्या मदतीने केली. बेगने दहशतवादी कृत्यात सहभाग घेऊन जर्मन बेकरीत बॉम्बस्फोट घडविले. त्यामध्ये १७ लोकांचा मृत्यू झाला, तर ५७ जण जखमी झाले. यामध्ये जखमींचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले. हे कृत्य मानवतेविरुद्धचे आणि देशाच्या सुरक्षिततेला, सार्वभौमत्वाला आव्हान देणारे आहे. या घटनेत स्फोटकाचा वापर केल्याने मोठी जीवितहानी होणार असल्याची जाणीव आरोपीला होती. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरून आरोपी हा दहशतवादी मानसिकतेचा असल्याचे दिसून येते. तसेच त्याच्या हालचालीवरून तो दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचे दिसून येते,’ असे न्यायालयाने निकालात म्हटले.
तत्पूर्वी न्यायालयाने गुरुवारी सकाळी शिक्षेवर बेगचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर शिक्षेवर दोन्ही वकिलांचा युक्तिवाद झाला. त्यानंतर सायंकाळी बेगला न्यायालयीन कठडय़ात बोलवून फाशीची शिक्षा सुनावली. शिक्षा सुनावताच तो हादरून गेला, त्यानंतर तो सतत रडत होता. न्यायालयातून बाहेर घेऊन जाताना चक्कार आल्याने तो खाली बसला. त्याला पाणी पाजून दोन पोलिसांच्या मदतीने नेण्यात आले. यावेळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

तीन वर्षांनी न्याय
कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीत १३ फेब्रुवारी २०१० रोजी सायंकाळी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर ५७ जण जखमी झाले होते. मृतांमध्ये पाच परदेशी नागरिकांचाही सहभाग होता. या सर्वाना व त्यांच्या कुटुंबियांना गुरुवारी न्याय मिळाला. या बॉम्बस्फोटामध्ये मिर्झा हिमायत बेग या एकमेव आरोपीला ७ सप्टेंबर २०१० रोजी दुपारी सव्वा तीन वाजता दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने मोहसीन चौधरी, अहमद सिद्दीबाप्पा उर्फ यासीन भटकळ व इतरांच्या मदतीने हा बॉम्बस्फोट केल्याचे सांगितले होते.