चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना चाप लावता यावा, म्हणून पुण्यातील अमनोरा टॉवर परिसरातील रस्त्यावर टायर किलर स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत. पुण्यातील रस्त्यावर पहिल्यांदाच अशा प्रकारे ‘टायर किलर’ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्यात येत आहे. पण कोणतीही परवानगी न घेता हे टायर किलर बसवल्याचा आक्षेप हडपसर पोलिसांनी घेतला असून हडपसर वाहतूक पोलिसांनी अॅमनोरा पार्कला नोटीस पाठवली आहे. हे ‘टायर किलर’ तातडीने हटवा, अन्यथा कारवाई करु, असं हडपसर वाहतूक पोलिसांनी अॅमनोरा पार्कला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटलंय.

पुण्यातील रस्त्यावर पहिल्यांदाच अशा प्रकारे ‘टायर किलर’ तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करण्यात येत आहे. स्पीड ब्रेकरसारखे दिसणारे हे टायर किलर तुम्ही योग्य दिशेने जात असाल तर टायरला सपोर्ट करतात. पण जर तुम्ही विरुध्द दिशेने गेला तर वाहनाच्या टायरमध्ये हे चार इंची लोंखडी काटे घुसतात व टायर ‘बर्स्ट’ होतो.

येथील अॅमानोरा पिअर्सन स्कूल परिसरात अनेक सोसायट्यांमधूनही नागरिक बेशिस्तीने येत होते. त्यामुळे अपघाताचा धोका होता. यावर उपाय म्हणून प्रशासनाने जनजागृतीही केली; पण त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर प्रशासनाने येथे ‘टायर किलर’ यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला. हे बसवण्याच्या आधी महिनाभर याविषयी लोकांना माहिती देण्यात आली होती, असं टाऊनशिपच्या व्यवस्थापक मंडळाचं म्हणणं आहे, पण आता पोलिसांनी नोटीस बजावल्याने हे टायर किलर काढण्यात येणार आहेत.