पुण्यातल्या होर्डिंग दुर्घटने प्रकरणी रेल्वे कर्मचारी पांडुरंग वनारे आणि संजय सिंग या दोघांना अटक करण्यात आली आहे. संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर आहे तर पांडुरंग वनारे हा रेल्वेमधे लोहार म्हणून काम करतो. हे दोघे होर्डींग काढण्याचे काम करत होते. मात्र होर्डींग वरुन कापण्याऐवजी त्यांनी खालून कापण्यास सुरुवात केली होती. शुक्रवारी दुपारी जुना बाजार येथील मुख्य चौकात होर्डिंगचा लोखंडी सांगाडा कोसळून झालेल्या भीषण अपघातात चार जणांना जीव गमवावा लागला तर सात जण गंभीर जखमी झाले. मध्ये रेल्वेच्या जागेत रस्त्यालगत हे होर्डिंग उभारण्यात आले होते.

दुघर्टनेसाठी ‘रेल्वे’ जबाबदार; जाहिरात कंपनीचा दावा

मध्य रेल्वे प्रशासनाने यासाठी जाहिरात एजन्सीला दोषी ठरवले आहे. परंतु, आता ज्या जाहिरात कंपनीकडे या होर्डिंगचा ठेका होता. त्यांनी मात्र या दुर्घटनेसाठी मध्य रेल्वेच दोषी असल्याचा दावा केला आहे. यासाठी त्यांनी यापूर्वी मध्य रेल्वेशी हे होर्डिंग काढण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रती पुरावा म्हणून सादर केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु, या प्रकारातून मध्य रेल्वे प्रशासनाची अनास्थाही समोर आली आहे.

शुक्रवारी पुण्यातील जुना बाजार मुख्य चौकातील होर्डिंगचा लोखंडी सांगाडा काढताना तो सिग्नलसाठी उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावर पडला होता. यात चार जणांना नाहक जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेनंतर एकमेकांकडे बोट करण्यात आले.
या होर्डिंगचा ठेका कॅप्शन या जाहिरात कंपनीकडे होता. यापूर्वी या कंपनीने अनेकवेळा मध्य रेल्वेच्या अभियंता विभागाला हे होर्डिंग काढण्याबाबत पत्रव्यवहार केला. पण त्यांना रेल्वे प्रशासनाकडून कोणतेच उत्तर देण्यात आले नाही. या अनास्थेमुळे मात्र चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाने या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर गंभीररित्या जखमींना प्रत्येकी १ लाख रुपये तर किरकोळ जखमी झालेल्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेशही दिले आहेत