सरकारने 9 ऑगस्टपूर्वी आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास गनिमी काव्याद्वारे सरकारला उत्तर दिले जाईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी पुण्यात मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चाच्या समारोपाप्रसंगी 9 ऑगस्टपूर्वी आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास गनिमी काव्याद्वारे सरकारला उत्तर दिले जाईल असा इशारा दिला. आंदोलनकर्त्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ते मागे घेण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आज पुण्यात डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साडे अकरा वाजता मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर पुढे बालगंधर्व रंगमंदिर चौक,पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या बाजूने पुढे शिवाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याच्या येथे समारोप झाला. यावेळी एका तरुणीने मागण्यांच्या निवेदनाचे वाचन देखील केले. तर अर्धा तास मोर्चेकरी ठिय्या मांडून बसले होते. यावेळी अनेकांची भाषणे देखील झाली. मोर्चा दरम्यान सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबाद येथे काकासाहेब शिंदे या तरुणाने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर जगन्नाथ सोनवणे यांनी देखील विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या सर्व घटनानंतर राज्यातील मराठा समाजाकडून ठिकठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहे, तर अनेक ठिकाणी बस फोडण्याच्या घटना घडल्या आहेत.