News Flash

गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्याच्या निर्णयाचा राज्यसरकारनं पूर्ण विचार करावा, पुण्याच्या महापौरांचा सल्ला

रेड झोनमधल्या जिल्ह्यांसाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

संग्रहित छायाचित्र

गृहविलगीकरण पूर्णपणे बंद करण्याविषयी राज्यसरकारनं पूर्ण विचार करावा, असा सल्ला पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला. राज्यातील १८ जिल्हय़ात करोना रुग्णांची संख्या सरासरीपेक्षा अधिक असल्याने गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दुपारी सांगितले.

या १८ जिल्ह्यामध्ये पुण्याचा देखील समावेश असून त्यावर महापौर मोहोळ म्हणाले की, राज्य सरकारने या निर्णयाचा पूर्ण विचार करावा. या निर्णयाबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना महापौर म्हणाले की, पुणे शहरात रुग्ण संख्या आटोक्यात येत असून प्रशासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे. मात्र आज राज्य सरकारने १८ जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार न करता, कोविड सेंटरमध्ये उपचार करावेत, असे म्हटले आहे. हा निर्णय व्यवहार्य नसून त्याबाबत पूर्ण विचार करण्याची गरज आहे. तसेच अशा प्रकारचा निर्णय घेण्याची आता तरी वेळ नव्हती, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

आणखी वाचा- Maharashtra Covid 19: या १८ जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद; कोव्हिड केंद्रातच व्हावं लागणार दाखल

राज्यातल्या करोना आकडेवारीच्या सरासरीपेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण संपूर्णपणे बंद कऱण्याचे आदेश दिल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. म्युकरमायकोसिस आणि करोना या दोन आजारांसंदर्भातल्या आज झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले, “जे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्ये गृहविलगीकरण १०० टक्के बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सर्व बाधितांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातल्या कोविड केअर सेंटर्सची संख्या वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.”

राज्यात सध्या सातारा, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, बीड, रायगड, पुणे, हिंगोली, अकोला, अमरावती, कोल्हापूर, ठाणे, सांगली, गडचिरोली, वर्धा, नाशिक, अहमदनगर, लातूर हे जिल्हे रेड झोनमध्ये आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 7:02 pm

Web Title: pune mayor murlidhar mohol said state government should think again on decision regarding home isolation vsk 98 svk 88
Next Stories
1 “तुम्ही मुख्यमंत्र्यांचा आदेश डावललात, तर आम्ही रस्त्यावर उतरू”, खैरेंचा इम्तियाज जलील यांना इशारा!
2 धक्कादायक… आरेच्या सीईओच्या घरात सापडली तीन कोटींची कॅश
3 “गुजरातमधल्या पाचवी नापास आमदारासारखं रुग्णाला इंजेक्शन दिलं नाही,” रोहित पवारांचं दरेकरांना उत्तर
Just Now!
X