पुण्यात लसींच्या कमतरतेमुळे गेल्या चार दिवसांपासून लसीकरण बंद होतं. मात्र, आज पुण्याला लसींचे ३०,००० डोस मिळणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. या ३० हजारांपैकी २०,००० डोस हे कोविशिल्ड लसींचे असतील तर १०,००० कोवॅक्सिनचे डोस असतील.

पुण्यात सध्या १८२ लसीकरण केंद्रे आहेत. मात्र लसींच्या तुटवड्यामुळे गेल्या चार दिवसांपासून पुण्यातलं लसीकरण थांबलं होतं. आता लसींचे नवे डोस आज मिळणार असून आता दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचं महापौर मोहोळ यांनी स्पष्ट केलं. कोविशिल्ड लसींचे सर्व डोस दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी वापरण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारचा पुढील आदेश असेल त्या पद्धतीने कोवॅक्सिन लसीचे डोस १८ ते ४४ वर्षे वयोगटातल्या नागरिकांच्या लसीकरणासाठी वापरण्याबाबत विचार कऱणार असल्याचंही मोहोळ यांनी सांगितलं.

लसींच्या अनियमित पुरवठ्यामुळे संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झाल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. राज्य सरकारने लसींच्या पुरवठ्याबाबत अधिक सक्षम नियोजन करायला हवं तसंच त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात समन्वय असायला हवा असंही महापौर मोहोळ यांनी सुचवलं आहे.
आज येणाऱ्या या ३० हजार लसी एकच दिवस पुरणार अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.

पुणे शहरात करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे महानगरपालिका आणि पतंजली योगपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, जे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत, तसेच या आजारातून बाहेर पडलेल्या व्यक्तींना योगगुरू बाबा रामदेव हे उद्या दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली होती.