पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोलीजवळील आडोशी बोगद्याच्या तोंडावर रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दरड कोसळून दोन मोटारीतील दोघे जण जागीच ठार झाले, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरडीचे दगड मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर पसरल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडील मार्गावर दगड बाजूला करत दोन्ही बाजूंकडील एक मार्गिका खुली करण्यात आली. दरम्यान, प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने मुंबई-पुणे दरम्यान दोन विशेष गाडय़ा सोडल्या.
दिलीप गोपाळ पटेल (वय ५२, रा भाईंदर, मुंबई), शशिकांत धामणकर (डोंबिवली) अशी या अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर निर्मला गोपाळ पटेल (वय ६०, रा भाईंदर), मंगल माने (वय ३५), सुशीला धामणकर (वय ६०, डोंबिवली) या जखमी झाल्या आहेत. जखमींना पुण्यातील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आडोशी बोगद्याजवळ पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या मान्झा गाडीवर दरड पडल्याने मोटारीतील धामणकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर दगडांच्या माऱ्याने मोटारीतून बाहेर फेकल्या गेल्याने माने व धामणकर या जखमी झाल्या. याचवेळी मुंबईहून पुण्याकडे येत असलेल्या स्क्वॉडा मोटारीवर दगड पडल्याने दिलीप पटेल व निर्मला पटेल हे जखमी झाले. यापकी दिलीप पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटात मोठय़ा प्रमाणात दरडी कोसळल्याने मुंबई व पुणे दोन्ही मार्ग बंद पडले. त्यातच या परिसरात द्रुतगती व राष्ट्रीय महामार्ग एकच असल्याने वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी मार्ग नसल्याने १२ ते १५ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तात्पुरता पर्याय म्हणून वाहतूक िशग्रोबाच्या जुन्या घाटातून वळविल्याने तो घाट व खोपोली शहरातही प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दुपारी दोनच्या सुमारास पुण्याकडे येणाऱ्या मार्गावरील दगड बाजूला करीत एक लेन पुण्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी व एक लेन मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली. तसेच जेसीबी मशीन व पोकलेन मशीनच्या सहाय्याने मुंबई लेनवरील दगडी काढण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले होते. मागील महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याने द्रुतगती महामार्गाने प्रवास करणे वाहनचालक व प्रवाशांसाठी धोकादायक बनले आहे. मागील महिन्यात २२ जून रोजी खंडाळा बोगद्यासमोर दरड कोसळली होती.