पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात खासगी कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. यापुढे शनिवारवाड्यात फक्त महापालिका आणि अन्य सरकारी कार्यक्रमच होतील. पर्यटकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे महापालिकेने शुक्रवारी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करुन ही माहिती दिली.

पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा राष्ट्रीय संरक्षित वास्तू असून या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यापारी आस्थापना आहेत. याशिवाय शनिवारवाड्याजवळ लालमहाल, नानावाडा, तसेच ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर, नवग्रह शनी मंदिर, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ही धार्मिक स्थळे देखील आहेत. त्यामुळे या परिसरात पर्यटकांसह ग्राहक आणि भाविकांची वर्दळ असते.

शनिवारवाड्यातील व्यासपीठ आणि पटांगण कार्यक्रमांसाठी दिले जाते. यासाठी अडीच हजार रुपये भाडे आकारले जाते. शनिवारवाड्यात कार्यक्रम असल्यास गर्दीत भर पडते. यामुळे शिवाजी रस्ता आणि बाजीराव रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी आणि नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षेचा विचार करुन महापालिकेने या पुढे शनिवारवाड्यातील व्यासपीठ आणि खुले पटांगण खासगी कार्यक्रमांना न देण्याचा निर्णय घेतल्याचे महापालिकेने म्हटले आहे. महापालिका व अन्य सरकारी कार्यक्रमांसाठीच शनिवारवाड्याचा वापर करता येईल, असे महापालिकेने स्पष्ट केले.

महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला महासभेत मंजुरी मिळणे गरजेचे असून सत्ताधारी भाजपचे बहुमत असल्याने या निर्णयाला मंजुरी मिळेल, असे सांगितले जाते.  ३१ डिसेंबर रोजी शनिवारवाड्यात एल्गार परिषद झाली होती. यानंतर शनिवारवाड्यातील खासगी कार्यक्रमांवर बंदी घालण्याची मागणी समोर आली होती.