पुणे ते नाशिक आणि मनमाड ते इंदूर या नव्या रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी बुधवारी लोकसभेत दिली.
रेल्वे अर्थसंकल्पावरील लोकसभेतील चर्चेला उत्तर देताना बन्सल यांनी महाराष्ट्रातील या दोन रेल्वे मार्गांना मंजुरी देण्यात आल्याचे सांगितले. पुणे ते नाशिक रेल्वेमार्गाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करण्यात येत होती. सध्या पुण्याहून रेल्वेने नाशिकला जाण्यासाठी कल्याणमार्गे जावे लागते. त्याऐवजी स्वतंत्र पुणे ते नाशिक मार्ग तयार करण्याची मागणी होती. त्याला अखेर हिरवा कंदील मिळाला.
मनमाडहून इंदूरला जाण्यासाठी मालेगाव, धुळे मार्गे नवा रेल्वेमार्ग तयार करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गामुळे या दोन्ही शहरांमधील औद्योगिक विकासाला पुढील काळात चालना मिळणार आहे. त्याचबरोबर या मार्गामुळे मध्य रेल्वेने मुंबईहून नवी दिल्ली जाण्याचा कालावधीही कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात येते आहे. इंदूर-पुणे रेल्वेच्या फेऱया वाढविण्यात येणार असल्याचे बन्सल यांनी सांगितले.