X

आयटीतील नोकरी सोडून पुण्यातील तरुण ऐटीत लष्करात !

कुटुंबातील कोणीही सैन्यदलात नसताना निनादने मात्र आपले स्वप्न सत्यात उतरवून दाखवले.

चांगले शिक्षण, मग उत्तम पगाराची नोकरी आणि सुखावह आयुष्य असावे असे प्रत्येकालाच वाटते. मग सरकारी नोकरी, बँकेतील नोकरी किंवा आयटीमध्ये संधी मिळाल्यावर ती कोण सोडणार? आर्थिकदृष्ट्या सर्व सुरळीत सुरु असताना एका तरुणाला मात्र स्वस्थ बसवत नव्हते. देशप्रेमाने प्रेरित असलेल्या या तरुणाने हातात असलेल्या नोकरीवर पाणी सोडत लष्करात जाण्याचा निर्णय घेतला आणि तो त्यात यशस्वीही झाला. हा तरुण पुण्यातील असून निनाद लेले असे त्याचे नाव आहे. २४ वर्षीय निनादने नोकरी सोडून देत सैन्यभरतीच्या परीक्षा दिल्या आणि सैन्यदलात लेफ्टनंटपदावर भरतीही झाला.

कुटुंबातील कोणीही सैन्यदलात नसताना निनादने मात्र आपले स्वप्न सत्यात उतरवून दाखवले. निनादचे शालेय शिक्षण हे पुण्यातील बालशिक्षण मंदिर येथे झाले. तर सिंहगड इन्सिट्यूट येथून त्याने संगणक अभियंत्याची पदवी घेतली. त्यानंतर लगेचच त्याला हिंजवडी येथील अक्सेंचचर या नामांकीत कंपनीत नोकरीही मिळाली, पण या कामामध्ये तो रमेना. मग त्याने यूपीएससीतर्फे घेतली जाणारी सीडीएस ही परीक्षा दिली आणि त्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला. फेबुवारीमध्ये या परीक्षेचा निकाल आल्यावर चेन्नई येथे लष्कराचे प्रशिक्षण घेण्यासाठी तो रवाना झाला. प्रशिक्षण झाल्यानंतर तो लेफ्टनंट म्हणून भारत चीन सीमेवर काम करण्यास रवाना झाला आहे. त्यामुळे निनादच्या रुपाने पिढीला एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

लेफ्टनंट निनादचे वडील विलास लेले हे सुजमिल केमिकल क्वॅलिटी कंट्रोल कंपनीत इन्चार्ज म्हणून काम करतात. तर त्याची आई वृषाली लेले या आर्थोपेडिक एम्पांटचा व्यवसाय करतात. तर त्याचा मोठा भाऊ रोहन एमएस असून तो अमेरिकेत नोकरी करीत आहे. याबाबत बोलताना निनादची आई म्हणाली, लहाणापासून सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करावी अशी त्याची इच्छा होती. सैन्य दलात जायचंय असं तो कायम म्हणायचा. आम्हीही त्याच्यावर कधीच दबाव आणला नाही. त्याने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सैन्य दलात जाण्याचे स्वप्न सत्यता उतरविले याचा आम्हाला आनंद आणि अभिमान आहे.