24 February 2021

News Flash

पाकिस्तानमधील जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी: शरद पवार

मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना पाकिस्तानमध्ये गेलो होतो. सामना संपल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेल मालकाने आमच्याकडून पैसे घेतले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

पाकिस्तान म्हटलं की हल्ला आणि दहशतवाद इतकंच आपल्या डोळ्यासमोर येते. पण पाकिस्तानमध्ये तसे चित्र नाही. पाकिस्तानमधील सर्वसामान्य जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांच्या ‘वी द चेंज, आम्ही भारताचे लोक’ या पुस्तकाचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. पुस्तकातील भारत- पाकिस्तान संबंधावरील उल्लेखाबाबत शरद पवार म्हणाले, पाकिस्तान म्हटले की आपल्या डोळ्यासमोर दहशतवाद आणि हल्ला इतकेच येते. पण पाकिस्तानमधील जनतेला भारतीयांबद्दल आपुलकी आहे. शरद पवार यांनी पाकिस्तान दौऱ्यातील एक आठवणही या प्रसंगी सांगितली. ‘मी बीसीसीआयचा अध्यक्ष असताना पाकिस्तानमध्ये गेलो होतो. सामना संपल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. त्या हॉटेल मालकाने आमच्याकडून पैसे घेतले नाही. तुम्हाला मी टीव्हीवर बघितले होते. तुम्ही आमचे पाहुणे असल्याने मी पैसे घेणार नाही, असं त्याने सांगितल्याचे पवार यांनी नमूद केले.

पवार पुढे म्हणाले, लोकमान्य टिळकांनी काँग्रेस सर्वसामान्य माणसाच्या हाती आणण्यासाठी प्रयत्न केले. लोकांना एकत्र आणायचे काम त्यांनी केले. देशाला खऱ्या अर्थाने स्थैर्य लाभले ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी समाजातील शेवटच्या घटकाला संविधानात अधिकार दिला. तर संसदीय लोकशाही पद्धतीला दिशा देण्याचे काम जवाहरलाल नेहरू यांनी केले, असेही पवार यांनी सांगितले. १९७७ च्या निवडणुकीने देशाला वेगळी दिशा दिली, असंही त्यांनी स्पष्ट केले.

लोकांना आज चांगले पर्याय, चांगले नेतृत्व दिसत नाही. त्यामुळे जनतेत अस्वस्थता आहे. नोटबंदीचा निर्णय घ्यायचा अधिकार पंतप्रधानांना नाही. मात्र तरीही अशा प्रकारचा निर्णय मोदींनी घेतला. यामुळे नक्षलवाद आणि दहशतवाद संपेल अशी दिशाभूल करण्यात आली, अशी टीका त्यांनी केली.

राज्यात शेतकरी आत्महत्या हा गंभीर विषय आहे. मात्र, सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय घेताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये हीच आमची भूमिका आहे, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2018 8:47 pm

Web Title: pune pakistani people love indian says ncp chief sharad pawar
Next Stories
1 भाजपा सरकार मराठा समाजाविरोधात नाही: विनायक मेटे
2 मराठा आरक्षणासाठी माथाडी कामगाराची आत्महत्या
3 संभाजीराजे जागे व्हा! घेराव घालत मराठा आंदोलकांची घोषणाबाजी
Just Now!
X