राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांना कारवाई करत धनंजय कुडतरकरला ताब्यात घेतले. दरम्यान, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याही याविरोधात आक्रमक झाल्या असून कुडतरकरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

शरद पवार आणि उर्मिला मातोंडकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. दरम्यान, या तक्रारीनंतर कुडतरकर याच्या फेसबुक वॉलवरून ती पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. परंतु त्याचे फेसबुक अकाऊंट सुरू असल्याची असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, धनंजय कुडतरकर हा बुधवार पेठेत राहणारा असून मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कार्यरत आहे. यापूर्वी उर्मिला मातोंडकर यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिपण्णीनंतर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कुडतरकर याच्या घरावर मोर्चा काढला होता. त्यानंतर कुडतरकर याने पोलीस ठाण्यात धाव घेत संरक्षण देण्याची मागणी केली होती.

तसेच राष्ट्रवादीचे नेते आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनीदेखील या घटनेचा निषेध केला होता. तसेच तो कोणाचा कार्यकर्ता आहे असा सवाल करत त्यांनी कुडतरकर याला धडा शिकवण्याची मागणी केली होती. सध्या कुडतरकरला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.