23 April 2019

News Flash

आजींच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या पाटल्या पोलीस अधिकाऱ्याने स्वखर्चाने दिल्या

पाटल्या परत मिळतील या आशेनं आजी दर आठवड्याला सांगवी पोलीस ठाण्यात यायच्या. मात्र प्रत्येक वेळी त्या रिकाम्या हातानेच घरी परतायच्या.

बलभीम यांनी दाखवलेल्या प्रेमाची जाणीव ठेवून कृतज्ञभावनेनं आजींनी श्रीफळ आणि फुल देऊन त्यांचा सत्कार केला.

पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या शांताबाई पिराजी चिंचणे आजींच्या पाटल्या काही महिन्यांपूर्वी चोरीला गेल्या. ८० वर्षांच्या शांताबाई एकट्या राहतात. महिना पाच हजार पेन्शनवर त्या आपलं पोट भरत आहेत. तुटपुंज्या मिळकतीतून आलेली पै- न – पै साठवत त्यांनी स्वत:साठी मोठ्या हौशीनं तीन तोळ्याच्या पाटल्या करून घेतल्या होता. मात्र फेब्रुवारी महिन्यात आजी उपचारासाठी रुग्णालयात गेल्या होत्या वेळी चोरांनी त्या लंपास केल्या.

इतकी वर्षे मेहनत करून, पैसे जमवून तयार केलेल्या पाटल्या गेल्या याचं दु:ख आजींना खूप होतं. याप्रकरणी सांगवी पोलिसात तक्रार देखील दिली, मात्र महिने उलटूनही पाटल्या काही त्यांना परत मिळाल्या नाहीत. अखेर आजींनी सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांच्यासमोर गाऱ्हाणं मांडलं. बलभीम नक्की मदत करतील असं एका ओळखीच्या व्यक्तीनं सांगितलं. आजींच्या तक्रारीची दखल घेत बलभीम यांनी तपासाला सुरूवात केली. मात्र त्यांच्या पाटल्या काही सापडल्या नाहीत. आज तरी माझ्या पाटल्या परत मिळतील या आशेनं आजी दर आठवड्याला सांगवी पोलीस ठाण्यात यायच्या. मात्र प्रत्येक वेळी त्या रिकाम्या हातानेच घरी परतायच्या. अवघं आयुष्य वेचून, मेहनत करून सोन्याच्या पाटल्या आजीने केल्या होत्या. म्हणूनच त्या अशाच सोडून जाणं आजींना पटत नव्हतं.

सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे

अखेर आजींची ती तळमळ पाहून बलभीम यांना दया आली. त्यांनी स्व:खर्चाने शांताबाई चिंचणे यांना सोन्याच्या पाटल्या बनवून दिल्या. पोलिसात दडलेल्या भावनिक आणि प्रेमळ माणसाची छवी बलभीम ननावरे यांनी दाखवून दिली. बलभीम यांनी दाखवलेल्या प्रेमाची जाणीव ठेवून कृतज्ञभावनेनं आजींनी श्रीफळ आणि फुल देऊन त्यांचा सत्कार देखील केला. बलभीम यांच्याशी भावनिक नाळ जोडल्या गेलेल्या आजी नेहमी त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत असतात. एकीकडे पोलिसांना नेहमी भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी म्हणून पाहिलं जातं परंतु सगळेच अधिकारी सारखे नसतात हे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननावरे यांनी दाखवून दिले आहे.

८० वर्षीय आजीचे संघर्षमय जीवन…

वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी शांताबाई पिराजी चिंचणे यांचा विवाह झाला होता. लग्नानंतर पुण्यातील स्वारगेट येथे त्या राहायला आल्या. त्यांचे पती बस चालक होते त्यामुळे संसार सुखाचा सुरू होता, मात्र त्यांच्या संसाराला नजर लागली त्यांचे आणि त्यांच्या पतीचे नेहमी भांडण होऊ लागले. विवाहानंतर चार वर्षांनी त्यांना पतीने घराबाहेर काढले. त्यांना माहेरचा एकमेव आधार होता. काही वर्षांनी शांताबाई यांच्या आई वडीलांचाही मृत्यू झाला,  भावानंही त्यांना घरातून बाहेर काढले. पुण्यासारख्या शहरात त्या एकट्या राहत होत्या. तिथेच नोकरी करून त्या आपलं पोटही भरत होत्या. वयाच्या ८० व्या वर्षी एकटं राहण्याचं दु:ख त्यांच्या वाट्याला आलं. सख्खा भाऊ जबाबदारी सांभाळण्यास तयार नाही. आपुलकीनं काळजी करणारं या जगात त्यांचं दुसरं कोणाही नाही. मात्र बलभीम यांनी दाखवलेल्या आपुलकीमुळे आजींनी मात्र खूपच आनंद झाला आहे.

First Published on August 10, 2018 10:36 am

Web Title: pune police inspector gifted gold bangles to 80 year old woman whoes jewellery stolen few months ago