संघविरोधकांचा आवाज दडपण्यासाठी कारवाई केल्याची टीका

हिंसक कारवायांवर विश्वास असलेल्या नक्षलवाद्यांचा शहरी भागातील काही चळवळींशी संबंध आहे का, हे तपासण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकांनी मंगळवारी दिल्ली, मुंबई, पुणे व नागपुरातील काही कार्यकर्ते तसेच वकिलांच्या घरावर एकाच वेळी छापे टाकले. ही कारवाई सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. यात नक्षलवाद्यांशी संबंधित भरपूर साहित्य हाती लागल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तर ही कारवाई संघविरोधी लोकांचा आवाज दडपण्यासाठी केली जात आहे, असा आरोप या कार्यकर्त्यांनी केला आहे.

गेल्या जानेवारीत पुण्याजवळील भीमा-कोरेगाव येथे मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराला जबाबदार धरण्यावरून हिंदुत्ववादी तसेच दलित संघटना समोरासमोर आल्या आहेत. मात्र, यात नक्षलवाद्यांचासुद्धा हात आहे व त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार पुण्यातील तुषार दामगुडे या तरुणाने विश्रामबागवाडी ठाण्यात दाखल    केली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी छापासत्र राबवण्यात आले. पुणे पोलिसांच्या विविध पथकांनी मंगळवारी सकाळी मुंबईत रिपब्लिकन पँथरचे सुधीर ढवळे व हर्षांली पोतदार यांच्या निवासस्थानी तसेच पुण्यातील ज्योती जगताप, रमेश गायचोर, ढवळा ढेंगळे, सागर गोरखे, नागपुरातील वकील सुरेंद्र गडलिंग तसेच दिल्लीतील रोना विल्सन यांच्या निवासस्थानाची पोलिसांनी झडती घेतली. पोलिसांची ही कारवाई दिवसभर सुरू होती. प्रामुख्याने जंगलात सक्रिय असलेली नक्षलवादी चळवळ आता शहरी भागातसुद्धा सक्रिय होऊ पाहात आहे. त्यासाठी या चळवळीने काही कार्यकर्ते तसेच त्यांच्या संघटनांना हाताशी धरल्याचा संशय पोलिसांना आहे. या पाश्र्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. पुण्यातील कबीर कला मंच व इतर काही संघटनांचा माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप याआधीही अनेकदा झाले आहेत. यावरून दहशतवाद विरोधी पथकाने काही कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही प्रकरणे सध्या न्यायालयात प्रलंबित आहेत.  ज्यांच्या घरी छापे घालण्यात आले, त्यापैकी काहीजण या मंचशी संबंधित आहेत. नागपुरातील वकील गडलिंग हे माओवाद्यांचे खटले न्यायालयात लढवतात. तर रोना विल्सन दिल्लीतील काही कडव्या डाव्या संघटनांशी संबंधित आहे.

या कारवाईचा भीमा-कोरेगावच्या घटनेशी काहीही संबंध नाही. ही कारवाई नियमित तपासाचा एक भाग आहे.

      – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

 

कारवाईत बरीच कागदपत्रे तसेच संगणक, पेनड्राईव्ह, हार्ड डिस्क व इतर डिजीटल पुरावे गोळा करण्यात आले आहेत. त्याची तपासणी केली जाणार असून त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल. सध्यातरी कुणालाही अटक केलेली नाही.

   – रवींद्र कदम, सह पोलीस आयुक्त, पुणे

ही कारवाई संघविरोधी विचार दडपण्याचा प्रकार आहे. अशा पद्धतीने छापेमारी करून सामाजिक चळवळींना नष्ट करण्याचे प्रकार सरकारने सुरू केले आहेत.

      – अ‍ॅड. सुरेंद्र गडलिंग