नक्षलवाद्यांचे समर्थक असल्याच्या संशयातून पुणे पोलिसांनी मुंबई, हैदराबाद, छत्तीसगड येथे छापे टाकले. हैदराबादमध्ये वारावर राव, मुंबईत अरुण परेरा, छत्तीसगमध्ये सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. त्यांच्या घरातून नक्षलवादाशी संबंधित काही कागदपत्रे व साहित्य जप्त करण्यात आल्याचे वृत्त असले तरी पोलिसांनी याला दुजोरा दिलेला नाही.

जानेवारीमध्ये पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात नक्षलवाद्यांचासुद्धा हात असू शकतो, अशी तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली होती. तुषार दामगुडे यांनी ही तक्रार दाखल केली होती. पुणे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली होती.

पुणे पोलिसांनी एप्रिलमध्येही मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली येथे छापे टाकून नक्षली साहित्य जप्त केले होते. काही दिवसांनी संबंधितांवर अटकेची कारवाई देखील करण्यात आली होती.

या गुन्ह्याचा तपास अजूनही सुरु असून मंगळवारी पुणे पोलिसांनी मुंबई, हैदराबाद, छत्तीसगडमध्ये छापे टाकले. हैदराबादमध्ये वारावर राव, मुंबईत अरुण परेरा, वर्नोन गोन्साल्विस, छत्तीसगमध्ये सुधा भारद्वाज आणि गौतम नवलाखा यांच्या घराची पोलिसांनी झडती घेतली. पोलिसांनी या कारवाईबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. वारावर राव हे प्रसिद्ध कवी असून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात येईल, असे सूत्रांनी म्हटले आहे.