जोरदार झालेल्या पावसामुळे यंदा देखील पुणे शहरात अनेक भागांत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या. यामध्ये सर्वाधिक फटका कात्रज आणि अंबिल ओढा भागातील नागरिकांना बसला. यावर अजित पवार म्हणाले की, दोन वर्षाहून देखील त्या परिसरात सीमा भिंतीचे काम झाले नाही. त्या कामावर महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होते असे सांगत, सत्ताधारी भाजपाला त्यांनी चांगलाच टोला लगावला.

यावेळी अजित पवार म्हणाले की, पुणे शहर आणि परिसरात मागील वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी कात्रज आणि अंबिल ओढा भागातील सीमा भिंत कोसळून अनेक घरांचे नुकसान झाले होते. तर यंदा देखील जोरात पाऊस झाल्याने अनेक घरात पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तेथील परिसरात सीमा भिंत बांधण्याचे कामाबाबत पुणे महापालिकेने लक्ष द्यायला पाहिजे होते. आजपर्यंत सीमा भिंत का बांधली गेली नाही? यामागील नेमके कारण काय ? या संदर्भात अधिकारी वर्गाला विचारणा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

कात्रज आणि अंबिल ओढा भागातील सीमा भिंत यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजप ला नागरिकांच्या नुकसानाला जबाबदार धरले होते. त्यांच्या टीकेला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील महापालिकेला जबाबदार धरल्याने, आरोप प्रत्यारोप सुरूच राहणार असल्याचे यातून दिसत आहे.

आणखी वाचा- जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले…

तक्रारी येऊन देऊ नका महाराज : अजित पवार
पुणे जिल्ह्यासाठी पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून आज विधानभवन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रुग्ण वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार चेतन तुपे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वर्गा उपस्थित होता. यावेळी अजित पवार यांनी कर्मचार्‍यांना हात जोडून म्हणाले की, चांगले काम करा, गैर वापर करू नका आणि तक्रारी येऊन देऊ नका महाराज असा दम, यावेळी त्यांनी कर्मचारी वर्गाला भरला.

आणखी वाचा- खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या वृत्तावर पहिल्यांदाच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अतिवृष्टीचा फटका बसलेल्यांना सर्वतोपरी मदत करणार : अजित पवार

राज्यातील अनेक भागाला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून संबधित भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. या संकटाच्या काळात राज्य सरकारमार्फत पावसामुळे झालेल्या नुकसान भागात, राज्य सरकार मार्फत सर्वतोपरी मदत करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. जोरदार झालेल्या पावसामुळे सोलापूर, पंढरपूर, सांगली यासह राज्यातील अनेक भागाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामध्ये विशेषतः शेतकर्‍यांचे हाताला आलेले पीक वाया गेले आहे. त्यामुळे अगोदरच करोना आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ज्या भागात नागरिक अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू असून ज्या भागाचे नुकसान झाले आहे. तेथील नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. सरकारकडून सर्वतोपरी मदत केली जात आहे.