छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पुणे सातारा महामार्गावरून सरकारला इशारा दिला आहे. रस्ता खराब झाल्यानं प्रवाशांची हेळसांड होत असून, अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत,” अशी चिंता व्यक्त करत उदयनराजेंनी जेसीबीनं रस्ता उखडून टाकू, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

वाई पालिकेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उदयनराजेंनी वाईला बैठक घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष प्रतिभा शिंदे मुख्याधिकारी विद्या पोळ नगरसेविका रुपाली वनारसे विकास शिंदे.ऍड दत्ता बनकर आदी उपस्थित होते. “पुणे सातारा महामार्ग खराब झाल्याने रस्ते विकास महामंडळाला संबंधित ठेकेदाराचे काम काढून घेण्याबाबत कळविले आहे. रस्ता खराब झाल्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे. तर अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. जर लवकरच रस्ता दुरुस्त झाला नाही तर स्वतः जेसीबी घेऊन रस्ता उघडून टाकणार आहे,” असा संतप्त इशारा उदयनराजे यांनी दिला.

“मतदारसंघ पुनर्रचनेत मतदारांच्या हिताचा विचार करण्यात आलेला नाही, तर राजकीय सोयीच्या दृष्टीने पुनर्रचना करण्यात आली. त्यामुळे मतदारांचे फार मोठे नुकसान झाले. चुकीच्या पद्धतीने मतदारसंघ तयार केल्यामुळे लोकप्रतिनिधींना मिळणारा निधी व मतदार संघाची मागणी यामध्ये फार मोठा फरक पडत आहे. लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात आणि खासदारांना पाच कोटी रुपये आणि विधानसभा मतदारसंघात तीन तालुके येतात व आमदारांना दोन कोटी रुपये विकासकामांसाठी येतात. मात्र मतदारसंघाची मागणी मोठी असल्यामुळे निधी अपुरा पडत आहे”, अशी तक्रार खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

“मुंबई पुणे दिल्ली बेंगलोर अहमदाबादसारख्या महानगरांमध्ये मोठ्या मोठ्या महापालिका असतात. त्यांचा स्वतःचा निधी व तेथील नगरसेवकांचा निधीही मोठा असतो तर ग्रामीण भागामध्ये मतदारसंघ मोठे आणि निधी तोकडा पडत असल्याने विकास कामे करता येत नाहीत . यासाठी महानगरांमधील खासदार ,आमदार निधी कमी करून तो देशाच्या ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचा निधी वाढविल्यास ग्रामीण भागातील अडचणी सोडविता येतील. हल्ली लोकांना खासदार आमदार कोण आहे त्यापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. जर विकासच झाला नाही तर सब कुछ झुट आहे. त्यामुळे संबंधितांनी याचा योग्य तो विचार करावा,” असं आवाहन त्यांनी केलं.

सातारा शहरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहे. त्यामानाने वाई शहरात विकासकामे कमी असल्याचे त्यांनी सांगितले. “नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी आपआपल्यातील मतभेद बाजूला ठेवून आमदार खासदार कोण आहे याकडे लक्ष न देता शहराच्या विकासाला प्राधान्य दिले पाहिजे. निवडून आलेले नगरसेवकांनाही मतदारांना उत्तरे द्यायची असतात मुळे प्रशासनाने दुजा भाव न करता सर्वांच्या विकासाला कामांना प्राधान्य द्यायला हवे .राज्य व केंद्र सरकारकडे जे विषय प्रलंबित आहेत त्याची यादी करून ते ताबडतोबीने माझ्याकडे पोचवा मी ते काम मार्गी लावतो,” असं उदयनराजे यावेळी म्हणाले.