पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या योजनेत देशातील २० शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये देशाची राजधानी नवी दिल्लीसह चेन्नई, भोपाळ, अहमदाबाद, सूरत आदी शहरांचा समावेश आहे. केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी नवी दिल्लीमध्ये या शहरांची घोषणा केली.
महाराष्ट्रातून दोन शहरांना पहिल्या टप्प्यात स्थान देण्यात आलेले असले, तरी तूर्त मुंबईला या योजनेत सहभागी करून घेण्यात आलेले नाही. देशातील ९८ शहरांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले होते. स्पर्धेतूनच केंद्रीय नगरविकास विभागाने या शहरांची निवड केली आहे. निवडीसाठी नेमलेल्या समितीने सर्वाधिक गुण भुवनेश्वरने दिलेल्या प्रस्तावाला दिले आहेत. त्यामुळे यादीमध्ये पहिल्या स्थानावर भुवनेश्वर आहे. दुसऱ्या स्थानावर पुण्याची निवड करण्यात आलेली असल्याचे व्यंकय्या नायडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दुसऱ्या टप्प्यात आणखी ४० शहरांचा योजनेत समावेश करण्यात येणार असून, तिसऱ्या टप्प्यात उर्वरित ४० शहरांचा समावेश करण्यात येणार आहे. निवड झालेल्या शहरांना या योजनेमधून प्रत्येकवर्षी १०० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. केंद्र सरकार या शहरांवर सुमारे ९६००० कोटी रुपये खर्च करणार आहे.
स्मार्ट सिटीसाठी निवड झालेली शहरे
भुवनेश्वर
पुणे
जयपूर
नवी दिल्ली
सोलापूर
जबलपूर
विशाखापट्टणम
काकीनाडा
बेळगाव
कोईम्बतूर
लुधियाना
भोपाळ
सूरत
कोची
अहमदाबाद
धवनगिरी
इंदूर
उदयपूर
गुवाहाटी
चेन्नई