सध्या राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अनेक ठिकाणी पुन्हा एकदा टाळेबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी ठाण्यात टाळेबंदीच्या मुदतावाढीचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पुन्हा एकदा कडक टाळेबंदी लागू करणार असल्याचं जाहीर केलं आहे. प्रशासनाच्या या निर्णयावरून भाजपा खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती दिली.

“ठाणे आणि पुणे शहरातील स्थितीबदल केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांच्याशी चर्चा केली. प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे नागरिकांचे होणारे हाल आणि व्यापाऱ्यांचे नुकसान याची सविस्तर कल्पना त्यांना दिली. संविधानाच्या मर्यादेतच पण केंद्राने अहवाल मागवून कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली असल्याचे सहस्त्रबुद्धे म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून यासंदर्भातील माहिती दिली.

आणखी वाचा- पुण्यातल्या लॉकडाउनवरुन गिरीश बापटांचा संताप, म्हणाले…

आणखी वाचा- …तर महाराष्ट्रात न्यूयॉर्कसारखी परिस्थिती निर्माण झाली असती : शरद पवार

नवा निर्णय..

पुणे, पिंपरी चिंचवड आणि हवेलीमध्ये १३ ते २४ जुलै या काळात संपूर्ण टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. पहिले पाच दिवस या भागात कठोर टाळेबंदी असेल. पहिल्या पाच दिवसांत केवळ दूध वितरण तसेच औषधे दुकाने आणि रुग्णालये सुरू राहातील. वृत्तपत्रांचे वितरणही या काळात सुरू राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले. ठाणे, कल्याण डोंबिवली शहरांमध्ये १९ जुलैपर्यंत टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आली. शुक्रवारी रात्री उशिरा मीरा-भाईंदर येथे आणखी नऊ दिवस टाळेबंदीची मुदत वाढविण्यात आल्याचे स्पष्ट झाले.

आणखी वाचा- Coronavirus : शरद पवार म्हणतात, “ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत परिस्थिती सर्वसामान्य होईल मात्र…”

ठाणे जिल्ह्य़ात टाळेबंदीतही १४ हजारांची रुग्णवाढ

ठाणे जिल्ह्य़ामध्ये करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आठ दिवसांपासून टाळेबंदी लागू करण्यात आली असली तरी या काळात जिल्ह्य़ात १४ हजार २०७ नवे रुग्ण आढळून आले. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत सर्वाधिक रुग्णवाढ होत असून, त्यापाठोपाठ ठाणे महापालिका क्षेत्राचा क्रमांक आहे. टाळेबंदीच्या काळात नवी मुंबईतील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली असून भिवंडी, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर येथे रुग्णसंख्या आटोक्यात आलेली नाही.