पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणातील उर्वरीत पाणीसाठा लक्षात घेऊन आज जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौर मुक्ता टिळक यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत,वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून पाणी पुरवठा होतो. या धरणांमधून शहराला दररोज 1350 एमएलडी पाणी पुरवठा केला जातो, पण आता 15 टक्के कपात केल्यामुळे दररोज 1150 एमएलडी पाणी पुरवठा केला जाणार आहे. पुढील वर्षभराच्या पाण्याचे नियोजन करण्यासाठी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे कालवा समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट,पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव आणि शहरातील भाजपा आमदार उपस्थित होते.

या बैठकी विषयी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणे शहराला दररोज 1350 एमएलडी पाणी पुरवठा केला जात होता. मात्र, यंदा खडकवासला धरणाव्यतिरिक्त पानशेत, वरसगाव धरणामध्ये पाऊस कमी झाला आहे. तर, टेमघर धरणाच्या दुरूस्तीच्या कामामुळे तेथील पाणीसाठा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येणार आहे. तसेच पुढील वर्षभराचा पुणे शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेता 15 टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. पाणी पुरवठा करण्याबाबतचे वेळापत्रक जलसंपदा विभागाला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सत्ताधारी भाजपाने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने या निर्णयावर विरोधक भविष्यात अधिक आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.