पुण्यात एका ४१ वर्षीय महिलेचा मृत्यू दुधीचा रस प्यायल्याने झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेला कोणताही आजार नव्हता, कोणत्याही आजाराची पार्श्वभूमीही नव्हती. तरीही दुधीचा रस प्यायल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महिलेने १२ जून रोजी सकाळी दुधीचा रस घेतला. त्यानंतर तिला उलट्या आणि जुलाब यांचा त्रास होऊ लागला. पुढील तीन दिवसात तिची प्रकृती आणखी ढासळली. तसेच तिला प्रकृतीच्या अनेक तक्रारी जाणवू लागल्या असे या महिलेच्या परिचितांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याआधीही देशात दुधीचा रस घेतल्याने मृत्यू झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने २०११ मध्येच दुधीचा रस कडवट लागल्यास तो अजिबात पिऊ नका असे आवाहनच केले होते. दुधीचा कडवट रस घेतल्याने पोटाचे विकार होऊ शकतात, त्यातले घटक विषारी असू शकतात ज्यामुळे जीवही जाऊ शकतो असेही इंडियन काऊन्सिलने म्हटले होते. तरीही अशा घटना घडताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच अभिनेते आदेश बांदेकर यांनाही दुधीचा ज्यूस घेतल्याने त्रास झाल्याची घटना घडली होती.

पुण्यातील महिलेने १२ जूनला ५ किमी अंतर धावून आल्यावर सकाळी ९.३० च्या दरम्यान दुधीचा रस घेतला होता. त्यानंतर ती आपल्या कारने ऑफिसला निघाली होती. तेवढ्यात तिला कारमध्येच उलटी झाली, तसेच मळमळही होऊ लागली त्यामुळे ती अर्ध्या वाटेतून घरी परतली. घरी आल्यावर तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. पोटदुखीही झाली, दुपारी १.३० च्या दरम्यान ती हॉस्पिटलमध्ये गेली. मात्र तोपर्यंत तिला कार्डिअॅक अरेस्ट आला अशीही माहिती या महिलेच्या निकटवर्तीयाने दिली आहे. या महिलेला दोन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

१५ जून रोजी तिच्या तब्बेतीत सुधारणाही होऊ लागली. मात्र तिच्या मेंदूतून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर तिची प्रकृती बिघडत गेली आणि याच आजारात तिचा मृत्यू झाला. पुण्यात अशा प्रकारे मृत्यू झालेली ही पहिली घटना नाही असे क्रिटकल एक्सपर्ट कपिल बोरावके यांनी म्हटले आहे. मी वर्षाकाठी अशा दोन तरी घटना पाहतो, एखाद्या भाजीचा रस लोक घेतात. तो कडवट लागला तरीही तो प्यायचा थांबवत नाहीत. त्यामुळे त्यांच्या पचनशक्तीवर परिणाम होतो, प्रसंगी मृत्यूही ओढावतो असेही त्यांनी स्पष्ट केले. दुधीचा रस किंवा इतर भाज्यांचा रस घेण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती नाही. तो कशा प्रकारे घ्यायचा हे लोकांना ठाऊकही नाही असेही त्यांनी म्हटले आहे.