लग्नघटिका समीप आली असताना मंडपातच नवरदेवाने वधू पक्षाकडे काही वस्तूंची मागणी केली. परंतु मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने नवरदेवास राग आला आणि त्याने सरळ भावी सासऱ्याच्या श्रीमुखात भडकावली. त्यामुळे गोंधळ उडाला आणि वधूने बोहल्यावर चढण्यास स्पष्ट नकार दिला. घनसावंगी तालुक्यातील पीरगायबवाडी येथे शनिवारी हा प्रकार घडला.
शनिवारी विवाह सोहळ्यासाठी वरपक्षाकडील मंडळी सकाळीच गावात दाखल झाली होती. परंतु लग्नघटिका समीप आली असताना वरील घटना घडल्यावर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. वादाची माहिती पोलिसांनाही मिळाली. त्यानंतर दोन्ही बाजूंच्या प्रमुख मंडळींच्या बैठकीत वादातून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला. परंतु लग्नाआधीच आपल्या वडिलांशी असभ्य वागणाऱ्या मुलाशी आपण लग्न करणार नाही, असे वधूनेच निक्षून सांगितले. त्यानंतर वरपक्षाकडील मंडळींना परतीचा रस्ता धरावा लागला. त्यानंतर या तरुणीचा विवाह अखेर नात्यातल्याच युवकाशी लावण्यात आला.