07 August 2020

News Flash

चुकीच्या माहितीची सामान्याला ‘शिक्षा’!

रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी दूरध्वनीनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी उतावीळपणा दाखविला खरा; परंतु त्यामुळेच एका सामान्य नागरिकावर नाहक मनस्तापाची वेळ आली! नांदेड पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे

| July 28, 2015 01:40 am

रेल्वेस्थानकावर बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी दूरध्वनीनंतर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी उतावीळपणा दाखविला खरा; परंतु त्यामुळेच एका सामान्य नागरिकावर नाहक मनस्तापाची वेळ आली! नांदेड पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार घडला.
आंध्र-कर्नाटक सीमेवरील नांदेड रेल्वेस्थानकावर शनिवारी एका अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी करून बॉम्ब ठेवले असल्याचे कळविले. सकाळी सव्वानऊला हा दूरध्वनी येताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. पोलीस अधीक्षकांसह सर्वच अधिकारी रेल्वेस्थानकावर धावले. बॉम्बशोधकासह पोलीस पथकाकडून रेल्वेस्थानकाची तपासणी सुरू असताना ज्या दूरध्वनीवरून ही माहिती कळविण्यात आली, त्याचा शोध सुरू करण्यात आला. वास्तविक, नियंत्रण कक्षाने आलेल्या दूरध्वनीचा क्रमांक योग्यप्रकारे नोंदवून वरिष्ठांना कळविला होता. मात्र, प्रत्यक्षात हा दूरध्वनी कोणाचा, याचा शोध सुरू झाला तेव्हा काहीतरी गडबड झाली आणि एका निष्पाप नागरिकाला पोलिसी खाक्याचा अनुभव घडला.
पोलिसांनी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू करताना ज्या क्रमांकाची तपासणी सुरू केली, तो व प्रत्यक्ष धमकी देणारा क्रमांक यात तफावत होती. बॉम्ब असल्याची धमकी असल्याने पोलिसांनी गंभीरतेने नोंद घेतली खरी; पण या प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने केला. परिणामी एका सामान्य नागरिकांला नाहक त्रास सहन करावा लागला.
ज्या व्यक्तीने धमकी दिली होती, त्याच्या मोबाईलचा क्रमांक नियंत्रण कक्षात नोंदवला गेला; परंतु शोध घेताना दुसऱ्याच क्रमांकाचा शोध घेण्यात आला. धमकी देणाऱ्याचा क्रमांक चुकीच्या पद्धतीने तपासला गेला आणि पोलिसांनी नागपूर येथील अविनाश गजानन राऊत या तरुणाला ताब्यात घेतले. कामासाठी परिसरात राहणाऱ्या अविनाश राऊत याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) सुपूर्द केले. या पथकाने त्याची कसून चौकशी केली. पोलिसांनी आवश्यक ती माहिती मिळत नसल्याने त्याला ‘प्रसाद’ही दिला. आपणास या धमकीसंदर्भात काहीच माहिती नाही, असे हा तरुण वारंवार सांगत होता. पण पोलिसांनी त्याला जुमानले नाही.
एटीएसच्या काही अधिकाऱ्यांना मात्र अखेरीस हा तरुण निर्दोष असल्याचे लक्षात आले आणि त्यांनी नांदेड पोलिसांना धमकी आलेल्या दूरध्वनीची पुन्हा तपासणी करावी, अशी सूचना केली आणि तेव्हा कोठे हा धक्कादायक प्रकार लक्षात आला. ज्या नंबरवरून धमकीचा दूरध्वनी आला होता, त्याची चौकशी करण्याऐवजी स्थानिक पोलिसांनी चुकीच्या नंबरची तपासणी केल्याने अविनाश राऊत याला नाहक त्रास सहन करावा लागला.
धमकी आलेल्या दूरध्वनीची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर हा दूरध्वनी माहूर तालुक्यातील सिंदखेड येथील बलदेव किशन राठोड याचा असल्याचे निष्पन्न झाले. सिंदखेड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. राठोडच्या अटकेने अविनाश राऊतची सुटका झाली असली, तरी नांदेड पोलिसांचा उतावीळपणा पुन्हा समोर आला. एखाद्या गंभीर प्रकरणात कशा पद्धतीने तपास केला जावा किंबहुना वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका कशी असावी, याचे सर्व संकेत या प्रकरणाचा तपास करताना पायदळी तुडवले गेल्याचे मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2015 1:40 am

Web Title: punishment to common man in false information
टॅग Nanded
Next Stories
1 पावसाअभावी भाज्या महागल्या
2 अर्थकारणाचे चक्र मंदावले, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट
3 औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय उड्डाणांना धावपट्टी सापडेना!
Just Now!
X