‘पीएमसी’ बँक घोटाळा प्रकरण

वसई : पंजाब महाराष्ट्र बँक (पीएमसी) घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ‘विवा’ होम्सचे व्यवस्थापैकीय संचालक मेहुल ठाकूर आणि संचालक मदन चतुर्वेदी यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

‘पीएमसी’ बँकेकडून ‘एचडीआयएल’ने घेतलेले कर्ज अवैधरीत्या ‘विवा’ कंपनीत वळविल्याची माहिती मिळाल्यानंतर सक्तवसुली संचालनालायने शुक्रवारी विरार येथील ‘विवा’ कंपनीच्या कार्यालयावर छापे घातले. ‘एचडीआयएल’ कंपनीचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि सारंग वाधवान हे ‘पीएमसी’ बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. ‘पीएमसी’ बँकेकडून घेतलेल्या कर्जापैकी १६० कोटी रुपये ‘विवा’ कंपनीत अवैधरीत्या वळविण्यात आल्याचा संशय ईडीला आहे.

‘एचडीआयएल’ची उपकंपनी असलेल्या गुरुआशीष कन्स्ट्रक्शनचे माजी संचालक प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून हा प्रकार घडल्याचा संशय असून, राऊत यांना नुकतीच अटक करण्यात आली.

या प्रकरणी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने ‘विवा’ ग्रुपच्या कार्यालयासह संचालक मंडळाच्या घरावर छापे घातले. कारवाई दरम्यान ७३ लाखांची रोकड तसेच महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. या वेळी ‘विवा’ कंपनीचे व्यवस्थापैकीय संचालक मेहुल ठाकूर, तसेच संचालक मदन चतुर्वेदी यांना ताब्यात घेण्यात आले. सुमारे ४ तासांच्या चौकशीनंतर दोघांना अटक करून मुंबईला आणण्यात आले. शनिवारी दोघांना न्यायालयात हजर केले असता २७ जानेवारीपर्यंत सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटक आरोपी मेहुल ठाकूर हे वसईचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे पुतणे आहेत. ‘विवा’ कंपनी आपल्या कुटुंबीयांची असली तरी तिच्याशी आपला संबंध नसल्याचे आमदार ठाकूर यांनी शुक्रवारीच स्पष्ट केले होते. ‘विवा’ कंपनीतून हितेंद्र ठाकूर यापूर्वीच बाहेर पडले आहेत.