करोना काळात शाळा, महाविद्यालये बंद असले तरी पुढील शैक्षणिक वर्षांच्या प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. यासाठी लागणारे विविध दाखलेसुद्धा शासकीय कार्यालयातून ऑनलाइन देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पण या बाबत कोणतीही सुस्पष्टता नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची दाखले मिळवताना मोठी फरफट होत आहे.

नुकतेच १० आणि १२ वी चे निकाल लागले आहेत. शाळा, महाविद्यालये बंद असले तरी यामुळे पुढील शैक्षणिक वर्षांच्या वाटचालीला ऑनलाइन पद्धतीने गती देण्याचे काम सुरू आहे.

याच धर्तीवर अनेक महाविद्यालयाने शाळांनी पुढील वर्षीच्या प्रवेश प्रक्रिया या पद्धतीने सुरू केल्या आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना जात, क्रिमीलेअर, उत्पन्नाचा दाखला आणि काही इतर दाखल्यांची आवश्यकता लागते. पण या वर्षी करोना महामारीमुळे शासकीय कार्यालयाने आपले कारभार ऑनलाइन नेले आहेत. याची बहुतांश विद्यार्थी आणि पालक यांना माहिती नाही. त्याचबरोबर दाखल्यासाठी कुठे अर्ज करायचा, त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज केल्यानंतर किती दिवसांत दाखले मिळतील याची सविस्तर माहिती पालक आणि विद्यार्थ्यांना नाही.

आपले सरकार या संकेत स्थळावरून त्या त्या स्थानिक पातळीवर हे अर्ज करावे लागत आहे. ही प्रक्रिया फार किचकट आहे. त्यातच ही संकेतस्थळे सतत  बंद पडत असल्याने पालकांना नोंदणी करताना नाकीनऊ येतात. तसेच या ठिकाणी अपलोड करत असलेली कागदपत्रे एका ठरावीक प्रमाणात हवी असतात त्यामुळेही सामान्य नागरिकांना ती अपलोड करता येत नाहीत.